वॉर्डरोबचे सुयोग्य व्यवस्थापन
esakal February 06, 2025 01:45 PM

- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार

मैत्रिणींनो, तुम्हाला कपड्यांसाठी जागा पुरत नसेल, तुमच्या कपड्यांच्या कपाटात म्हणजे वॉर्डरोबमध्ये कधीही न वापरले जाणारे कपडे असतील किंवा वेळेला हवे असलेले कपडे जर तुम्हाला मिळत नसतील, तर याचा अर्थ आहे, की तुमच्या वॉर्डरोबला ‘व्यवस्थापनाची’ गरज आहे.

वॉर्डरोब व्यवस्थापन म्हणजे कपाटातील कपडे, ॲक्सेसरीज आणि इतर वस्तू योग्य प्रकारे, नीटनेटकेपणाने आणि सुव्यवस्थित ठेवणे. हे व्यवस्थापन काय फक्त कामाला जाणाऱ्या स्त्रियांनीच करावे का? का ज्यांच्याकडे भरपूर कपडे आहेत, किंवा कपड्यांसाठी भरपूर जागा आहे, किंवा या सगळ्यासाठी ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे त्यांनीच करावे का? तर नाही. मैत्रिणींनो, तुम्ही कोणीही असा. गृहिणी, नोकरी- व्यवसाय करणाऱ्या, शहरात किंवा गावात राहणाऱ्या, किंवा कुठल्याही आर्थिक परिस्थितीतल्या. तुम्हाला यासाठी तुमच्या वॉर्डरोबचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे -

1) तुम्हाला कपडे निवडण्यात आणि शोधण्यात वेळ घालवायचा नसल्यास, वेळेची बचत करायची असल्यास.

2) तुम्हाला कपाट नीटनेटके, स्वच्छ आणि टापटीप ठेवायचे असल्यास.

3) कपड्यांवर होणारा खर्च कमी करायचा असल्यास. कपाटातल्या जागेचा योग्य वापर करायचा असल्यास.

वॉर्डरोबचे योग्य व्यवस्थापन हाही माझ्या कामाचा एक भाग असल्यामुळे अनेक लोकांना महिला आणि पुरुषांना मी त्यांचा वॉर्डरोब कार्यशील आणि नीटनेटका करून दिला आहे. त्याच्याच काही टिप्स आज तुम्हाला सांगणार आहे.

वॉर्डरोब कार्यशील बनवा : सगळ्यात आधी तुमच्या कपाटातल्या जुन्या किंवा खराब झालेल्या कपड्यांना निरोप द्या. उसवलेल्या, डाग लागलेल्या, इस्त्री नसलेल्या, मापात कमी जास्त असलेल्या कपड्यांची दुरुस्ती करून घ्या. तुम्ही वापरत नसलेले चांगले कपडे दान करा. वर्षातून किमान दोनदा अशा प्रकारे तुमचे कपाट कार्यशील बनवा.

कपड्यांची योग्य विभागणी आणि वर्गीकरण : तुमच्या कपाटातल्या कपड्यांची उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशी विभागणी करा. सध्या चालू असलेल्या हंगामासाठीचे कपडे पुढे किंवा सहज मिळतील अशा ठिकाणी ठेवा. तुमच्या कपड्यांचे प्रसंगानुसार वर्गीकरण करा. उदाहरणार्थ, ऑफिससाठी किंवा कामासाठी खास प्रसंगी घालायचे कपडे, व्यायामासाठी आणि घरगुती वापराचे कपडे वेगळे ठेवा.

कपाट लावतानाची कलात्मकता : कपडे, ॲक्सेसरीज, बॅग्ज ठेवण्यासाठी वेगवेगळे हँगर्स, बॉक्सेस, ड्रॉवर्स, डिवायडर्सचा वापर करा. रोजच्या वापरातले कपडे कपाटाच्या पुढच्या बाजूस आणि सहज मिळतील असे ठेवा. कपडे लावताना रंग आणि प्रकार (उदाहरणार्थ साड्या, सलवार, कुर्ता, जीन्स, टी-शर्ट) यानुसार लावा. त्यामुळे तुमच्या कपड्यांमध्ये कुठले रंग आणि प्रकार कमी आहेत ते लक्षात येईल.

ॲक्सेसरीजचे योग्य व्यवस्थापन : कपड्यांबरोबरच दागिने, चपला, बॅग्ज, दुपट्टा, स्कार्फ अशा ॲक्सेसरीजही व्यवस्थित ठेवा. जुन्या, वापरात नसलेल्या अथवा खराब झालेल्या ॲक्सेसरीज टाकून द्या अथवा त्यांना दुरुस्त करून वापरा.

मैत्रिणींनो लक्षात ठेवा, तुमचा वार्डरोब व्यवस्थापन वेळ, जागा आणि पैसा वाचवण्यासाठीही उपयुक्त ठरते. या व्यवस्थापनाने रोजच्या आयुष्यात सहजता येते, वेळ वाचतो, कपड्यांचा योग्य वापर होतो आणि व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.