तामिळनाडूमधील शिक्षकांद्वारे महिला विद्यार्थ्यांचा लैंगिक अत्याचार
Marathi February 07, 2025 11:24 AM

वृत्तसंस्था/चेन्नई

तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका शासकीय शाळेत तीन शिक्षकांनी 13 वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवत तिन्ही शिक्षकांना अटक केली आहे. तर शिक्षण विभागाने तिन्ही शिक्षकांना निलंबित केले आहे. तर घटना समोर आल्यावर लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कृष्णागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिकणारी 13 वर्षीय विद्यार्थिनी मागील काही काळापासून शाळेत जात नव्हती.

या पार्श्वभूमीवर शाळेचे शिक्षक तिच्या दीर्घ गैरहजेरीविषयी चौकशी करण्यासाठी तिच्या घरी गेले होते. विद्यार्थिनीच्या आईवडिलांनी तीन शिक्षकांकडून लैंगिक शोषण करण्यात आल्याची माहिती दिली. यानंतर शाळेच्या शिक्षकांनी आईवडिलांना पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यास सांगितले तसेच हे प्रकरण जिल्हा बालसंरक्षण शाखेसमोर उपस्थित केले. शाळेची मुख्याध्यापिका आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पंचायत युनियन मिडिल स्कूलच्या तीन शिक्षकांच्या विरोधात तक्रार नोंदविली. यानंतर मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांनी तिन्ही शिक्षकांना निलंबित केले आहे. पोलिसांनी तीन शिक्षकांना अटक करत चौकशी सुरू केली आहे.

द्रमुक सरकार शाळा परिसरात विद्यार्थिनींची सुरक्षा करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप अण्णाद्रमुकचे महासचिव एडप्पादी के. पलानिस्वामी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारत लोकांची माफी मागावी असे त्यांनी म्हटले आहे. तर पीडित विद्यार्थिनीला आवश्यक मदत केली जात असल्याची माहिती कृष्णागिरीचे जिल्हाधिकारी सी. दिनेश कुमार यांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.