Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यात नागा साधूंची क्रिकेट लीग... चौकार, षटकरांनी गाजवलं मैदान! फिल्डींग तर नाद खुळा... व्हिडिओ व्हायरल
esakal February 07, 2025 06:45 PM

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात साधूंचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या वातावरणात हा हलकाफुलका क्षण लोकांना भावला असून, अनेकांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. उत्तर प्रदेशातील त्रिवेणी संगमावर लाखो भाविकांचा ओघ सुरु असताना, काही साधूंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

महाकुंभमध्ये क्रिकेटचा अनोखा थरार

महाकुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक मेळा मानला जातो. लाखो श्रद्धाळू या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात, कारण असे मानले जाते की गंगास्नानाने सर्व पापे धुतली जातात. मात्र, यंदाच्या महाकुंभमध्ये एक वेगळेच आकर्षण पाहायला मिळाले – साधू क्रिकेट खेळताना!

एक्स (Twitter) वर जितेंद्र प्रताप सिंग यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून, त्यात साधू क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "महाकुंभच्या दरम्यान बाबांचा क्रिकेटचा आनंद." व्हिडिओमध्ये काही साधू उत्साहात बॅटिंग करत आहेत, तर काहीजण फिल्डिंग आणि बॉलिंग करताना दिसतात. चौकार-षटकारांचा वर्षाव पाहून गर्दीत जमलेले लोक जल्लोष करत आहेत.

सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया

हा अल्पावधीतच व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिले की, "यापेक्षा सुंदर दृश्य काय असू शकते?" तर काहींनी साधूंच्या खेळाडूवृत्तीचं कौतुक केलं आहे. क्रिकेट हा देशातील सर्वांत लोकप्रिय खेळ असल्याचे या प्रसंगाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

महाकुंभमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

महाकुंभमेळा केवळ धार्मिक विधींनाच समर्पित नाही, तर या ठिकाणी भारतीय संस्कृतीचा अनमोल वारसा देखील पाहायला मिळतो. आज, ७ फेब्रुवारीपासून येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. उत्तर प्रदेश सरकारने या कार्यक्रमांसाठी देशातील प्रसिद्ध कलाकारांना आमंत्रित केले आहे. सूफी गायक योगेश गंधर्व आणि आभा गंधर्व, कर्नाटकचे शास्त्रीय संगीतकार सुमा सुधींद्र, तसेच मथुरेचे डॉ. देवकीनंदन शर्मा यांचा 'रासलीला' कार्यक्रम हा खास आकर्षण ठरणार आहे.

Disclaimer

या व्हिडिओची सकाळ माध्यम समूह पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वाचकांनी स्वतंत्रपणे पडताळणी करूनच कोणत्याही निष्कर्षावर पोहोचावे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.