सध्या प्रयागराज येथे 'महाकुंभ मेळा 2025' सुरू आहे. अनेक कलाकारांनी या महाकुंभ मेळ्याला भेट दिली आहे. महाकुंभ मेळ्यामुळेच अभिनेत्री इशिका तनेजा (Ishika Taneja) सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने बॉलिवूडला रामराम ठोकून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. याची सुरूवात अभिनेत्रीने महाकुंभ मेळ्यातून केली आहे. इशिकाने आपले नाव बदलून 'श्री लक्ष्मी' असे ठेवले आहे. सध्या अभिनेत्री सनातन धर्माचा प्रचार करताना दिसत आहे.
अभिनेत्री तनेजा हिने शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली आहे. हे शंकराचार्य मध्यप्रदेशातील जबलपूर याठिकाणाच्या द्वारका-शारदा पीठाचे आहेत. इशिका तनेजाने 29 जानेवारीला महाकुंभ मेळ्याला भेट दिली. इशिका तनेजाने महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले. अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यावर इशिका म्हणते की, "तिला नाव आणि प्रसिद्धी मिळूनही तिचे आयुष्य अपूर्ण वाटू लागले. प्रत्येक मुलीने धर्माचे रक्षण आणि प्रचार केला पाहिजे. मुलींनी सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा आणि कालीचे रूप घ्यावे. "
सध्या इशिकाचे मेळ्यातील अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. चित्रपटसृष्टी सोडण्याबाबत इशिका म्हणाली की, "मला आयुष्यात शांती मिळत नव्हती. म्हणून मी शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेऊन सनातन धर्माचा प्रचार करण्यास सुरुवात केली."
अभिनेत्री इशिका तनेजा दिल्लीची आहे. तिचे शिक्षण लंडनमध्ये झाले आहे. तसेच इशिका तनेजा 'मिस वर्ल्ड टुरिझम इंडिया' ठरली आहे. इशिका तनेजाला 'इंदू सरकार' चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली होती. इशिका तनेजाने 'बिझनेस वुमन ऑफ द वर्ल्ड'चा किताब देखील जिंकला आहे. तिला राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने अनेक गाणी , सीरिज देखील केल्या आहेत.