राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
‘आपल्या घरात आपलं काम’ हे सूत्र घरात पाळलं गेलं पाहिजे. तसं नसेल तर, घरातला केरकचरा काढणं, भाजी निवडणं, घासलेली ओली भांडी पुसून जागेवर ठेवणं, कपड्यांच्या घड्या करणं, घर आवरणं अशी कामं करणं म्हणजे ‘आईला मदत करणं’ असा चुकीचा संदेश घरात दिला जातो. असा चुकीचा संदेश देण्याचं कारण, ‘ही कामं फक्त आईचीच आहेत’ असं चुकीचं गृहितक आहे. हे घर आपलं असल्यानं घरातील सर्व कामंसुद्धा आपलीच आहेत आणि ती सगळ्यांनी मिळूनच करायची आहेत. म्हणूनच अमुक कामं फक्त आईची आणि तमुक फक्त बाबांची आणि मदत करायची मुलांनी असं नव्हे.
मुलांसोबत भाजी निवडताना आपल्याला आणि मुलांना ही अनेक नवीन गोष्टी समजतात आणि गप्पा मारत शिकता येतात. भाजी निवडणं म्हणजे, शेंगा सोलणं, गवारी, घेवडा अशा भाज्या मोडणं आणि पालेभाज्या निवडणं असं अपेक्षित आहे. सोलणं, मोडणं आणि निवडणं यांसाठी विशेष कौशल्य आवश्यक असतं आणि ते अनुभवातूनच शिकता येतं. ती अनुभूती देणं यासाठी ‘मुलांसोबत भाजी निवडणं’ हा उपक्रम एकदम करेक्ट आहे!
भाजी निवडताना, मुलं आणि पालकांना आपल्या शिकण्याचं शेअरिंग करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. गप्पांची सुरुवात करताना पालकांनी, ‘आज शाळेत काय झालं? होमवर्क कंप्लीट झालं का?’ असे प्रश्न विचारले, की मुलं सावध होऊन चुळबुळ करू लागतात आणि पालकांना आवडतील अशी त्रोटक उत्तरं देतात. ही उत्तरं ‘खूपशी खरी असतात’ इतकंच.
म्हणून गप्पांची सुरुवात मुलांपासून न करता, पालकांनी स्वत:पासूनच करायची आहे. गेल्या आठ दिवसांत आपल्याला कुठल्या नवीन गोष्टी समजल्या? कुठल्या महत्वाच्या बातम्या/घडामोडी आवडल्या? काय नवीन पाहायला, वाचायला किंवा शिकायला मिळालं? हे मोकळेपणानं मुलांशी बोलावं. त्याबाबत मुलांचं मत विचारावं. प्रत्येकवेळी पालकांचं मुलाशी एकमत होईलच असं नाही.
काहीवेळा मुलाचं मत पटणारं नसलं, तरी त्याचं संपूर्ण बोलणं व्यवस्थित ऐकून घ्यावं. ‘तुला काही कळत नाही. तू काहीही बोलतोस’, असं पटकन न म्हणता त्यानं विचार करावा म्हणून काही वेगळे मुद्दे मांडावेत. त्याला पुन्हा विचार करण्याची संधी द्यावी आणि तरीही तो मताविषयी आग्रही असेल, तर त्या मताचा आदर करावा.
मुलांवर आपलं मत, विचार लादून कदापी प्रश्न सुटत नाही. आपलं मत मुलाला पटत नाही म्हणजे तो अगदीच ‘ढ’ आहे असं तर कदापि नाही. ‘आपण आपलं मत बाजूला ठेवून मुलाचं वेगळं मत समजून घ्यायला उत्सुक आहोत’ असा संदेश आपल्या वर्तनातून मुलाला मिळायला हवा.
आपण मुलांच्या मताचा आदर करतो याची जाणीव मुलांना झाली, की मुलंही मोकळेपणानं बोलू लागतात. त्यांचं शिकणं, त्यांच्या मित्र-मैत्रिणी, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांची स्वप्नं पालकांसोबत सहजी शेअर करू लागतात आणि गप्पांचं हेच फलित अपेक्षित आहे.
खरं सांगतो, भाजी निवडून झाली तरी गप्पांचा सिलसिला सुरुच राहतो. कारण अशावेळी शिकणं, शिकवणं आणि समजून घेणं एकजीव होऊन गेलेलं असतं. ‘घरातलं निर्भय वातावरण शिकवण्याला नाही, तर ‘शिकण्याला’ प्रेरित करत असतं’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल म्हणा.