जत : एका चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या केली गेली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी येथे काढलेल्या निषेध मोर्चा दरम्यान करण्यात आली.
चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याच्या कालच्या (ता. ६) घटनेने जत तालुक्यासह जिल्हा हादरून गेला. याप्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय ४५, रा. करजगी) याला उमदी पोलिसांनी अटक केली.
या घटनेच्या निषेधार्थ वेळी जत तालुक्यातील पक्ष, संघटनानी बंद व मोर्चाची हाक दिली होती. आज जत शहरात तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी हा खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वांनी केली.
यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. मोर्चात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.