किरण कवडे
नाशिक : आदिवासी बांधवांच्या पारंपारिक उत्पादनांचा ‘शबरी ब्रॅण्ड विकसित करत त्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यशस्वी ठरत आहे. यात मोहाच्या फुलांपासून बनविण्यात आलेली ‘मोहाची-द हेरिटेज वाईन’, सुमधुर मोगी भोग, मोहाच्या बियांचे तेल, मोहाचे सिरप, साबण, मॉईश्चराझर, लाडू, मध, कुकीज अशी अनेक दर्जेदार उत्पादने ‘शबरी नॅचरल्स’च्या माध्यमातून तयार होतात. त्यांची भारतात व विदेशात ऑनलाइन विक्री करण्यासाठी ‘ई-कॉमर्स’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, पोस्टाद्वारे ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविण्यात येत आहेत.
आदिवासी बांधवांची संस्कृती जगासमोर आणण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने त्याचा सर्वंकष अभ्यास करून गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार केली आहेत. विशेषत: आदिवासी बांधवांचा कल्पवृक्ष असलेल्या मोहाच्या फुलांपासून वाईन, साबण, मध, लहान मुलांच्या आवडीचे कुकीज, लाडू अशा २१ उत्पादनांचा यात समावेश आहे. शबरी महामंडळाने प्रभावी मार्केटिंग करण्यासाठी या उत्पादनांचे आकर्षक पॅकेजिंग केले आहे. ही उत्पादने ग्राहकांना व्यवस्थित पोहचावीत, यासाठी टपाल कार्यालयासोबत करार केला आहे. भारतातील कुठल्याही व्यक्तीने या उत्पादनांची मागणी केली तर त्यांना टपाल विभागाद्वारे ही उत्पादने पाठविली जातात. देशातच नव्हे तर विदेशातील नागरिकांनी ऑनलाइन बुकिंग केल्यास त्यांनाही ही उत्पादने पाठविली जातात.
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट’ या जागतिक संकेतस्थळांवर शबरी ब्रॅण्डची उत्पादने लवकरच जगभरात उपलब्ध होतील. त्यामुळे आदिवासींची ओळख बनलेल्या बांबूपासून बनविलेल्या प्रकाशाच्या माळा असोत की थेट शेतातील तांदूळ, विविध फुलांपासून तयार झालेला मध किंवा ज्वारी, नागलीपासून तयार केलेले लाडू, जिभेला अगदी नव्या चवीची अनुभूती देणाऱ्या मोह फुलांपासून बनविण्यात आलेले लाडू, आदी उत्पादने ‘शबरी नॅचरल्स’च्या माध्यमातून अवघ्या जगाला मिळतील. आदिवासींची ही महत्त्वपूर्ण उत्पादने सध्या महामंडळाच्या मुख्यालयात विक्रीस उपलब्ध आहेत.
या ब्रँडबाबत जनजागृती व्हावी, या हेतूने नुकतेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने ‘शबरी नॅचरल्स’ची सर्व उत्पादने असलेली बास्केट राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना भेट स्वरूपात देण्यात आले.
आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शबरी महामंडळामार्फत ‘शबरी नॅचरल्स’ हा ब्रॅण्ड तयार करण्यात आला आहे. याद्वारे आदिवासी बांधवांच्या उत्पादनांना नवसंजीवनी मिळत आहे. ‘ई कॉमर्स वेबसाईट’ही लवकरच तयार होईल. नागरिकांना घरपोच उत्पादने मिळावीत, यासाठी टपाल विभागासोबत करारदेखील झाला आहे.
- प्रा. डॉ. अशोक उईके, आदिवासी मंत्री
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या निधीमधून राज्यातील विविध आदिवासी शेतकरी प्रोड्यूसर कंपन्यांनी ही उत्पादने बनविली आहेत. आदिवासींच्या या समृद्ध संस्कृतीचे दर्शन जगाला घडविण्यासाठी शबरी नॅचरल्स हे उत्तम व्यासपीठ आहे.
- लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ
जंगली मधाचे प्रशिक्षण
आदिवासी शेतकरी तसेच महिला उद्योग समूहांना वित्त सहाय्याबरोबरच प्रशिक्षण दिले जाते. जंगली मध आढळणाऱ्या अमरावती भागातील आदिवासी महिलांना मधनिर्मितीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या मधाचे आकर्षक पॅकेजिंग आणि उत्तम ब्रॅंडिंग केले जाते.
वाईन, सिरप, मॉईश्चरायझरला पसंती
मोहाचे झाड म्हटले की सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे मद्य. पण मोहापासून विविध प्रकारची उत्पादने तयार होतात. यात वाईन, मोहाचे सिरप आणि तेलापासून बनविण्यात आलेले सिरप यांना अल्पावधीतच मागणी वाढली आहे. शबरी महामंडळाने जिल्ह्यामधील विविध प्रदर्शनात केलेल्या विक्रीमधून ग्राहकांनी या ‘प्रिमियम’ उत्पादनांना पसंती दिली आहे.