मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्रिपदाची होती ऑफर, फडणवीसांचे गौप्यस्फोट काय?; बंददाराआड काय चर्चा झाली?
GH News February 08, 2025 06:10 PM

2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की काय ठरलं होतं? अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला होता का? याचं गूढ अजूनही कायम आहे. कारण ठाकरे गटाच्या मते अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. तर, भाजपच्या म्हणण्यानुसार असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता. त्यामुळे नेमकं काय ठरलं होतं? याचं रहस्य कायम आहे. आता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रकाश टाकला आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मागितलं होतं. पण अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. उलट मीच त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘द जयपूर डायलॉग्स’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत 2019चा घटनाक्रमच सांगितला. नेमकं काय घडलं होतं? याची सविस्तर माहिती दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही युतीसाठी बसलो होतो. आमची युती फायनल झाली होती. पण एका रात्री उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं, “देवेंद्रजी, आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे. मी तुमच्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे. आता अंतिम निर्णय आज करू. आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवंय. रात्री 1 वाजता उद्धव ठाकरे मला बोलले.” मी म्हटलं, मी याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही. माझा पक्ष संसदीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेतो. आमचे अध्यक्ष अमित शाह आहेत. मी अमित शाह यांच्याशी बोलतो. त्यानंतर मी अमित शाह यांना रात्री 1 वाजता फोन केला. ते जागे होते. मी त्यांना म्हटलं आपलं सीट शेअरिंग फायनल झालं आहे. पण उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवं. अमित शाह म्हणाले, ते मंजूर नाही. तुम्ही त्यांना सांगा आम्हाला मंजूर नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. ते ऐकल्यावर मी अमित शाह यांना उद्धव ठाकरेंचं आणखी काय म्हणणं आहे ते सांगितलं. आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर आम्ही युती करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे, हे मी शाह यांच्या कानावर टाकलं. त्यावर अमित शाह यांनी मला थेटच सांगितलं की, त्यांना सांगा मग युती होणार नाही. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंना सांगितलं की, तुमचा प्रस्ताव आमच्या पक्षाला मंजूर नाही. आम्ही अडीच वर्षासाठी तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार नाही. कारण आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत आणि यापुढेही सर्वात मोठा पक्ष राहणार आहोत. त्यामुळे पाच वर्षासाठी मुख्यमंत्री आमचा राहील, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितंल. त्यावेळी मी त्यांना, मागच्यावेळी आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिलं नव्हतं. यावेळी तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ शकतो, असंही सांगितलं होतं, असं फडणवीस म्हणाले.

पालघरसाठी तो दावा सोडला

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, तर मग आपलं जमणार नाही. त्यानंतर ते आपल्या मार्गाने गेले, मी माझ्या मार्गाने गेलो आणि आमचं अलायन्स झालं नाही. चार दिवसानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून निरोप आला की, परत बोलायचं आहे. मी त्यांना म्हटलं, आता नव्याने चर्चा होणार नाही. जर तुम्ही अडीच वर्षाच्या मागणीवर अडून असाल तर आमची पार्टी त्यासाठी तयार नाही, असं मी त्यांना स्पष्टच सांगितलं. त्यावर आम्ही तो विषय सोडला असं ठाकरेंकडून सांगण्यात आलं. आम्हाला लोकसभेची एखादी सीट वाढवून देत असाल तर आम्ही अडीच वर्षाचा मुद्दा सोडून देऊ, असं आम्हाला ठाकरेंकडून सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही परत बसल्यावर त्यांनी पालघरची जागा मागितली. मी त्यासाठी तयार नव्हतो. कारण ती जागा आम्ही बऱ्याचवेळा जिंकली होती. आमची पारंपारिक जागा होती. पोटनिवडणुकीतही आम्ही जिंकलो होतो. त्यावर ठाकरे म्हणाले, आम्हाला ही सीट पाहिजेतच. त्यानंतर मी अमित शाह यांच्याशी बोललो. त्यावर शाह यांनी, जाऊ दे, ते आपले जुने मित्र आहेत. एका सीटने काय फरक पडणार? तुम्ही द्या त्यांना जागा, असं सांगितलं. अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही उमेदवारांसहीत ठाकरेंना पालघरची जागा दिली, असा दावा त्यांनी केला.

एक तास आधी फोन आला…

पीसीच्या एक दिवस आधी मला ठाकरेंचा फोन आला. अमित शाह आणि मी मातोश्रीवरून पत्रकार परिषदेला येतो असं सांगितलं. मी अमित शाह यांना त्याबाबतची माहिती दिली. त्यावर अमित शाह म्हणाले, मी मातोश्रीवर येतो. पण कोणती चर्चा होणार नाही. त्यावर, कोणतीही चर्चा होणार नाही, असं मी अमित शाह यांना सांगितलं. मग आम्ही गेलो. त्यानंतर मी अमित शाह यांना घेऊन जाताना एक तास आधी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. मी म्हणालो, काय बोलायचं आहे? त्यावर ते म्हणाले, मला अमित शाह यांच्याशी बोलायचं आहे. आमच्या काही भावना मांडायच्या आहेत. आमच्या काही गोष्टी ऐकल्या गेल्या नाहीत हे सांगायचं आहे. पुढे सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या पाहिजे, त्यासाठी मला अमित शाह यांच्याशी बोलायचं आहे. त्यावर मी म्हटलं, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी बोलून टाका. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, अशी माहितीही त्यांनी दिली.

त्यानंतर आम्ही मातोश्रीत गेलो. आम्ही मातोश्रीत बाहेरच्या रुममध्ये बसलो होतो. आदित्य आणि रश्मी वहिनीही होत्या. त्यावेळी मीच उद्धव ठाकरेंना आठवण करून दिली की, तुम्हाला काही तरी बोलायचं होतं. ते म्हणाले हो 5 मिनिट बोलतो. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शाह आतल्या रुममध्ये 10-12 मिनिटं बसले. त्यानंतर मला आत बोलावलं आणि सांगितलं की आता चर्चा अशी झालीय की, एक फेस सेव्हिंग आपल्याला द्यायचा आहे. आता तुम्ही पीसीत असं सांगा की सत्तेत आमचा (शिवसेनेचा) सहभाग असेल, असं ते म्हणाले.

वहिनींसमोर तीच गोष्ट बोलून दाखवली

त्यावेळी पत्रकार परिषदेत फक्त मीच एकट्याने बोलायचं ठरलं होतं. ठाकरे आणि अमित शाह बोलणार नव्हते. पीसीत काय बोलायचं हे मी त्यांना बोलून दाखवलं. त्यानंतर रश्मी वहिनींना बोलावलं. मी परत तीच गोष्ट वहिनींसमोर बोलून दाखवली. तीच गोष्ट मी हिंदीत बोललो. मी काय बोलायचं ते मंजूर झालं. त्यानंतर आम्ही ब्ल्यू सी नावाचा हॉल आहे तिथे गेलो. आणि जसं ठरलं होतं, तशीच माझी कॅसेट वाजवली. हिंदी, मराठीत बोललो. दोघे काही बोलले नाही. त्यानंतर आम्ही तिथून निघालो, असं सांगतानाच मातोश्रीच्या बंददाराआड अशी कोणतीही वेगळी गोष्ट ठरली नव्हती. आतमध्ये 10 मिनिटासाठी हे लोक बसले होते. आत काही ठरलं असतं तर मला सांगितलं गेलं असतं. असा काही विचार आहे हे सांगितलं असतं. पण तशी कोणतीच चर्चा झाली नव्हती, असंही ते म्हणाले.

त्यानंतर मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. प्रत्येक सभेत मोदी, शाह आणि नड्डा वारंवार देवेंद्रच्या नेतृत्वात लढत आहोत. देवेंद्र मुख्यमंत्री बनणार आहेत, असं म्हटलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे सभेत टाळ्या वाजवत होते, असं सांगतानाच भाजपने उद्धव ठाकरेंना काही आश्वासन दिलं होतं, असं आपण एका मिनिटासाठी समजू. पण निकाल लागल्यावर त्यांनी फोन करून काय करायचं, काय नाही हे ठरवलं असतं ना? असा सवाल फडणवीस यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.