मायदेशातच होत असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी पुढील आठवड्यात सुरू होणारी महिला आयपीएल (WPL) महत्त्वाची ठरेल, असा विश्वास भारतीय आणि मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला.
१९ वर्षांखालील महिला संघाने या वयोगटाचे विश्व अजिंक्यपद पुन्हा मिळवून भारतीय महिला क्रिकेटसाठी मापदंड तयार केला आहे. त्यामुळे आम्हा सीनियर खेळाडूंची जबाबदारी वाढली आहे. असे सांगून पुढे म्हणाली, महिला आयपीएल संपल्यानंतर विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत मोठी विश्रांती आहे. यादरम्यान आम्हाला तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेता येणार आहे.
महिला आयपीएलची तयारी करत असलेल्या माजी विजेत्या मुंबई इंडियन्स संघाची आज पत्रकार परिषद झाली. त्यात हरमनप्रीतसह मुख्य प्रशिक्षक शार्लोट एडवर्डस, गोलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटॉर झुलन गोस्वामी उपस्थित होत्या.
आमच्याकडे दर्जेदार कोअर टीम आहे. यातील स्थानिक खेळाडू, तर देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगलाच प्रभाव दाखवत आहे. १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेतील जी. कमलिनी आणि संस्कृती गुप्ता या खेळाडूसुद्धा मुंबई इंडियन्स संघात असल्यामुळे आमची ताकद वाढलेली आहे, असे झुलन गोस्वामी यांनी सांगितले.
या महिला आयपीएलने एकूणच महिला क्रिकेटचा दृष्टिकोन बदलला आहे आणि याचा परिणाम खोलवर होत आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्येही लहान खेळाडूंचीही मानसिकता कणखर होत आहे. कमालीचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तयार होत आहे, असे झुलन म्हणाल्या.
मी बंगालची खेळाडू आहे, पण मी स्थानिक क्रिकेट खेळत असताना आमच्याकडे कोणी लक्ष देत नसायचे, परंतु आता महिला आयपीएलमुळे देशातील विविध भागांमध्ये तरुण मुलींमध्ये क्रिकेट खेळाडू होण्याची प्रबळ इच्छाशक्ती तयार होत आहे, असेही झुलन यांनी सांगितले.
या महिला आयपीएलचे महत्त्व केवळ भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियात या स्पर्धेबाबत विचारणा केली जात आहे, असे एडवर्डस म्हणाल्या. भारताने सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील महिला संघाचे विजेतेपद मिळवणे यावरून भारताची क्षमता दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.