जल्लोष नव्या संकल्पनांचा, साहित्याचा..
esakal February 09, 2025 01:45 PM

- मृगा वर्तक, saptrang@esakal.com

जगप्रसिद्ध जयपूर साहित्य महोत्सवाचं यंदाचं अठरावं वर्ष. गेल्या अठरा वर्षांत साहित्याचे अंतरप्रवाह झपाट्यानं बदलताना दिसताहेत. तरुणाई साहित्यात कसं योगदान देतेय, नव्या संकल्पना, नवे बदल कसे घडताहेत, भावनांच्या प्रकटीकरणाचे ओघ कुण्या दिशेला आहेत इथपासून जयपूरच्या आर्थिक-सामाजिक संस्कृतीवर या महोत्सवाचे काय पडसाद उमटतात, याचा संमेलनाला उपस्थित राहून घेतलेला आढावा...

नमिता गोखले नावाच्या एका लेखिकेनं २००२मध्ये दिग्गी महालात साहित्य उत्सवाचं आयोजन केलं होतं. सुरुवातीला १०० पेक्षा जास्त उपस्थिती नसलेल्या या उत्सवाला पुढच्या पाचच वर्षांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साहित्य रसिकांची संख्या वाढल्यानं युकेच्या गार्डियन वृत्तपत्रानं या महोत्सवाला जगातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या साहित्य उत्सवातील एक म्हणून स्थान दिलं.

भारतीय साहित्यानं मिळवलेलं हे पहिलं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ. गेली अठरा वर्षं सातत्यानं हा उत्सव जयपूर शहरात होतोय. या मधल्या काळात महोत्सवानं साहित्यासहीत संगीत, कला आणि खाद्यसंस्कृतीला आपल्यात सामावून घेतलंय. विदेशी पर्यटक रसिकांना हा महोत्सव केवळ राजस्थानची नाही, तर भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो.

भारतीय साहित्यासोबतच भारताच्या इतर राष्ट्रांशी असलेल्या संबंधातून जो सांस्कृतिक दुवा सांधला गेला; त्यातून निर्माण झालेलं सृजन काळाच्या ओघात पुसून गेलं, तरी त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न यावर्षीच्या उत्सवातून झाला. ही नव्या सांस्कृतिक चळवळीची सकारात्मक बाजू.

साहित्याचे आंतरप्रवाह जोखताना एक विलक्षण बाब समोर येते, ती म्हणजे साहित्याला भाषेचे बंधन नाही. यापूर्वीही नव्हते. भारतीय साहित्याची परंपरा केवळ मौखिक नाही, तिच्या अमूर्त अभिव्यक्तीही आहेत. ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये केवळ शब्दांचा आणि अक्षरांचा उत्सव नाही, तर इथं भावनांचा आणि उत्कट अभिव्यक्तींचा जल्लोष पाहायला मिळाला.

सकाळी शास्त्रीय संगीतानं सुरुवात होऊन दिवसभर विविध विषयांवर परिसंवाद आणि रात्री पुन्हा मनोरंजनाचे कार्यक्रम अशी एकंदर उत्सवाची रूपरेषा होती. क्लार्क आमेर या पंचतारांकित हॉटेलात साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

सूर्यमहाल, बैठक, चारबाग, दरबार हॉल, आफ बागन, हिरवळ आणि राजस्थान बुकमार्क अशा सात सभागृहांतून दिवसभर विविध चर्चासत्रे, परिसंवाद होत होते. कला, इतिहास, विज्ञान या विषयांसहित अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि पाककला यांविषयी झालेल्या अभिचर्चांतूनही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

‘सकाळ माध्यम समूहा’चा हल्लाबोल, अमोल पालेकरांच्या गप्पा आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी अशी ओळख असलेल्या शशी थरूर यांनी सहभाग घेतलेल्या दोन्ही चर्चासत्रांत रसिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. हल्लाबोल हे सत्र नाट्य अभिव्यक्तीविषयी होतं. रंगमंच हा केवळ मनोरंजनाचा मंच नव्हे, तर भारतीय रंगमंच म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात छाती ठोकत उभं असणारं व्यासपीठ, अशी ओळख आपल्या थिएटरची होती.

परंतु कालपरत्वे ती पुसली जातेय का? व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या पथनाट्याचा आवाज कोण रोखतंय? विद्रोह करणाऱ्यांची गळचेपी कायद्याचे रक्षकच हातात लाठी घेऊन करताहेत का? असे अनेक प्रश्न या चर्चासत्रात उपस्थित झाले आणि अनुत्तरीतच राहिले. हे अनुत्तरीत प्रश्न नव्या दमाच्या विचारी मनांची घुसमट करतात. या आत्मिक कोलाहलातून सर्जनाच्या प्रवाहांचा आरंभ होतो.

ही ऊर्जा येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आशादायक आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती आणि त्यांची लेक अक्षता मूर्ती या मायलेकींच्या गप्पा होत्या. सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्याकडं भारतात आदर्श कुटुंब म्हणून पाहिलं जातं, या कुटुंबातल्या अनेक घटना, प्रसंग अक्षतानं सांगितले. यावेळी मूर्तीचे जावई ऋषी सुनक नारायण मूर्तीसोबत प्रेक्षागृहात बसून कौतुकानं आपल्या पत्नीचे अनुभव ऐकत होते.

गंभीर विषयांवर चर्चा

महोत्सवात काही गंभीर विषयांवर चर्चाही झाल्या. अनेक वक्त्यांनी ठळक विचार मांडले. कथाकथन हा लहान मुलांसाठी समजला जाणारा साहित्यप्रकार असला, तरीही तो फार महत्त्वाचा असल्याचं नील गेमन यांनी म्हटलं. आपल्या सभोवतालचं किंबहुना विश्वाविषयीचं आकलन करून घेताना कथाकथन महत्त्वाचं ठरतं. आपलं म्हणणं एखाद्याला प्रभावीपणे सांगता येतं, तेव्हाच त्या घटनेचं आकलन आपल्याला झालंय असं मानायला हवं.

याबरोबरच युवाल नोवाह आणि शोशाना यांनी नव्या तंत्रज्ञानाचे साहित्यनिर्मितीवर झालेले परिणाम सांगितले. नव्या तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावरच मोठा प्रभाव आहे, तेव्हा सृजनातून तो साकार होणं अपरिहार्य आहे. एआय तंत्रज्ञानानं आज काल्पनिक बुद्धिमत्ता शक्य झालीय. अशावेळी आपण कवितासुद्धा ‘एआय’चा वापर करून करू शकतो. या काळात आपल्या साहित्यनिर्मितीत काय वैविध्य असेल याचा विचार साहित्यिकांनी करावा असे प्रतिपादन त्यांनी केलं.

याबरोबरच नव्या तंत्रज्ञानाला घाबरून न जाता त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या प्रभावी लेखानासाठी आपण करायला हवा, असेही त्या म्हणाल्या. पारंपरिक साहित्य आणि नवं तंत्रज्ञान यासोबतच पर्यावरणाची भूमिका साहित्यनिर्मितीत काय असा प्रश्न एका पर्यावरणवादी वक्त्यांना विचारला गेला. सध्या भारतात आणि भारताबाहेरही अनेक ठिकाणी प्रदूषण झपाट्यानं होतेय, तेव्हा याबाबत आपण थेट पावलं उचलायला हवीत असं त्यांनी म्हटलं.

आपण राहत असलेलं वातावरण जेवढं प्रसन्न, तेवढं ते सृजनक्षम असतं. आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न असल्या की काही करण्याची, निर्माण करण्याची इच्छा होते. इतर वेळी आजार, नैराश्य आहेच. याचा थेट परिणाम समाज जीवनावर होऊ शकतो. समाजाचा समतोल ढळण्यास पर्यावरण असंही कारणीभूत ठरतं. आपली विवाहसंस्था आणि कुटुंब संस्था साहित्यनिर्मितीसाठी कारणीभूत ठरू शकते, असं स्पष्ट विधान फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाविषयी बोलताना वक्त्यांनी केलं.

भारत, चीन आणि जपान या देशांच्या कुटुंबरचनेमुळं या देशांतून जन्माला येणाऱ्या कथा आपल्याला जगावं कसं हे सांगतात. जयपूर लिटफेस्टच्या संस्थापिका नमिता गोखलेसुद्धा या महोत्सवात उपस्थित होत्या. ‘आपण जेवढं वाचू, आत्मसात करू, तेवढे बदल आपल्यावर अभावितपणे होत असतात. आपल्यात होणारे बदल न्याहाळले की आपल्याला कुण्या दिशेला जायचंय याची स्पष्टता येते. आपलं जीवन मार्गक्रमण करायला सोपं जातं,’ असं सांगताना, जगभरातील साहित्याचा आस्वाद घ्या असं त्यांनी उपस्थितांना सुचवलं.

महोत्सवाचं आर्थिक गणित

जयपूर साहित्य महोत्सवाचं अर्थशास्त्र समजून घ्यायला हवं. हा साहित्य महोत्सव जयपूर शहर आणि राजस्थान राज्यासाठी एक महत्त्वाचा आर्थिक चालक आहे. अंदाजे ५०-६० कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची उलाढाल या ५ दिवसांत होते. या महोत्सवात अडीच लाखांहून अधिक लोक येतात, ज्यामुळे स्थानिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या बुकिंगमध्ये वाढ होते. दुकानांच्या मालाच्या मागणीत वाढ होते.

स्थानिक व्यवसायांचे उत्पन्न वाढते, ज्यानं अंदाजे १०० ते १५० कोटीचा आकडा सहज पार केला जातो. याबरोबरच कार्यक्रम कर्मचारी, स्वयंसेवक आणि सेवा प्रदात्यांसाठी तात्पुरत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पर्यटनाला चालना मिळते. महोत्सवाचे आयोजन, लॉजिस्टिक्स, वक्त्यांचे मानधन आणि पणन-विपणनासाठी मोठा खर्च येतो, तरी त्याचे आर्थिक फायदे कार्यक्रमाच्या खर्चाच्या तुलनेत जास्त असतात. जयपूरच्या पर्यटन आणि सांस्कृतिक उद्योगांच्या वाढीला आणि विकासाला हातभार लागतो. गेल्या १८ वर्षांपासून हा महोत्सव जयपूरच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक झालाय.

समाजाच्या घडणीत योगदान?

केवळ आर्थिक नाही तर समाजाच्या घडणीतसुद्धा या महोत्सवाचं योगदान असावं. जयपूरकरांची लेखणी समृद्ध करणं महोत्सवाचं उत्तरदायित्व आहे. तसं होताना दिसतंय का? व्यासपीठावर उपस्थितांपैकी अत्यल्प उपस्थिती राजस्थानी लेखकांची होती. हे चित्र नक्कीच विचलित करणारं आहे. गेल्या २२ वर्षांत जयपूरच्या आर्थिक सामाजिक जीवनाला चालना देणाऱ्या या महोत्सवाचं हे अपयश आहे.

तरुणांचा व्यासपीठावरचा सक्रिय सहभाग कितपत होता हा माझा नेहमीचा लाडका प्रश्न. याबाबतीतही निराशाच दिसून आली. काही ठराविक चर्चासत्रांत हिरिरीनं सहभाग घेऊन प्रश्न करणारे तरुण दिसले, तेव्हा मात्र विचार करू पाहणाऱ्या आणि पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधू पाहणाऱ्या या पिढीच्या अभिमानानं उर भरून येतो.

‘इकीगाई’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचे लेखक आणि शशी थरूर यांच्या चर्चासत्राच्या शेवटाला ज्या शाळकरी मुलांना फेस्टिव्हल व्हिजिटला आणलं होतं, त्यापैकी एकानं उठून विचारलं, ‘स्वतःची काळजी घ्यावी, कर्तव्य, जबाबदाऱ्या सांभाळाव्या हे मान्य. पण स्वतःचा शोध कुठून घ्यावा?’ हा प्रश्न म्हणजे व्यासपीठावरच्या मान्यवर आणि उपस्थितांसाठी चपराक होती.

साहित्याविषयी थोडं...

जगभरातील साहित्याविषयी या संमेलनात विविध सत्रांत बोललं जातं. पैकी भारतीय साहित्याच्या चर्चा होताना बंगाली आणि मराठी साहित्याचे दाखले वेळोवेळी ऐकू आले. तर दुसरीकडं उर्दू शेरोशायरीही उदाहरणादाखल ऐकू आली. यातून एक स्पष्टता येते, उर्दूत निर्माण झालेले साहित्य आजही सर्वांना आपलं वाटावं इतकं जिवंत आहे, तर बंगाली आणि मराठी साहित्यात अनेक कलामूल्यं, जीवनमूल्यांचा समुच्चय असावा.

काही कमतरता...

जयपूर साहित्य महोत्सवाच्या कमतरतांविषयीही बोललं जातं. लोकप्रियता आणि सांस्कृतिक महत्त्व असूनही, जयपूर साहित्य महोत्सवात अनेक कमतरता आहेत. हे संमेलन केवळ अभिजात वर्गाला डोळ्यासमोर ठेवून आयोजित केल्याची टीका नेहमीच झालीये. निधी संकलनाच्या प्रयत्नात महोत्सव परिसरात विक्री करण्यात येणारे पदार्थ, वस्तू यांची किंमत नक्कीच बाजारी मूल्याच्या तुलनेत जास्त आहे. काही सत्रे आणि कार्यक्रम सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांसाठी अगम्य आहेत, असंही म्हटलं जातं.

महोत्सवाचं व्यावसायिकीकरण झालंय का? तर नक्कीच झालंय. महोत्सवाच्या वाढत्या व्यापारीकरणामुळं साहित्यिक उलाढालीपेक्षा प्रायोजकत्वाला प्राधान्य देण्याबद्दल चिंता समीक्षक व्यक्त करतात. त्याबरोबरच बहुजनांच्या प्रतिनिधित्वाचा अभाव महोत्सवात दिसून येतो. अनेक समस्या स्थानिक नागरिकांनीही सांगितल्या. महोत्सवाच्या वाढत्या प्रसिद्धीनं गर्दी, लांब रांगा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा अशा समस्यांनी लॉजिस्टिक आव्हानं निर्माण झाली आहेत.

समाजमाध्यमांचा प्रभाव

अधोरेखित करावी अशी एक गोष्ट. लेखकाची किंवा वक्त्याची ओळख सांगताना त्याच्या प्रकाशित पुस्तकांसहित त्यांना इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मिळालेल्या प्रसिद्धिविषयीही कौतुकानं बोलण्यात आलं. यातून समाज माध्यमांची अपरिहार्यता आणि आजच्या युगातील त्यांची गरज दिसून येत होती. मला अधोरेखित करावासा वाटतोय तो मुद्दा म्हणजे परिचर्चा आणि संवादसत्रांचे विषय चांगले होते, मात्र चर्चा काहीशा मुद्दा सोडून झाल्या.

विचारलेल्या थेट प्रश्नांना अचूक शब्दात उत्तरं देण्यासाठी लेखक अपयशी ठरत होते. अर्थात, काही अपवाद वगळता, उदा. अमोल पालेकरांनी तसेच काही विदेशी लेखकांनी प्रत्येक प्रश्नाला मुद्देसूद उत्तरं दिली, पण इतर लेखकांचा भर मुद्दा सोडून भरकटण्यावर होता असं दिसून आलं.

एकंदरीतच, एखाद्या काळाचं दस्तऐवजीकरण म्हणजे साहित्य. साहित्याला मूल्यांचं, भावनांचं आणि तत्त्वाचं अधिष्ठान लाभतं आणि या महोत्सवांमुळं या ऐवजाची देवाण-घेवाण होते. सहभाग घेणाऱ्यांना समृद्ध करणारी ही संमेलनं शहरा-शहरांत, गावा-गावांत, भाषा-भाषांतून व्हायला हवीत. आणि या महोत्सवांत प्रत्येक नागरिकाचं योगदान असावं...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.