जपुया बीज वारसा ---------लोगो
(४ फेब्रुवारी टुडे ३)
अन्न म्हणून आदिम बियाणांचे स्थान खूप महत्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय अन्न आणि शेती संघटनेनुसार जगातील प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळण्याचे काही निकष आहेत. हे सारे आदिम बियाण्यांपासून तयार होण्याला अन्नाला लागू होतात. सर्वांत प्रथम म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्तीला अन्न सहज उपलब्ध व्हावे आणि ते सहज परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे त्याकरिता हे अन्न स्थानिक पातळीवर पिकवलेले असावे. हे अन्न त्या व्यक्तीची भूक भागवणारे त्याचबरोबर त्याच्या शरीराला पोषण देणारे असावे. या पोषणामुळे त्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्याचा आजारांपासून बचाव व्हावा. हे अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्याची उपजीविका उत्तम राखता यावी. हे सारे करत असतानाच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, कार्बन फूटप्रिंट कमीत कमी असावे. आदिम बियाण्यांपासून केलेली शेती आणि त्यापासून उत्पादित केलेले अन्न या सर्व निकषांवर खरे उतरते.
- rat१०p२.jpg-
P25N44268
- कुणाल अणेराव ,वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था
---
आदिम बियाण्यांमुळे
खर्च, पर्यावरण ऱ्हास कमी
स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली बियाणी वापरून अन्न उत्पादन केले जाते तेव्हा बियाण्यांवर अजिबात खर्च होत नाही. स्थानिक बियाण्यांमध्ये एक नैसर्गिक लवचिकता आहे. शतकानुशतके स्थानिक माती, हवामान आणि पाण्याची उपलब्धता यांच्याशी जुळवून घेतल्यामुळे ही लवचिकता तयार झाली आहे. काही देशी तांदळाच्या जाती पाणी साचलेल्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ज्ञात आहेत तर काही कडधान्ये दुष्काळी भागात कमी पावसात वाढू शकतात. या नैसर्गिक अनुकूलतेमुळे या बियाण्यांना खते आणि कीटकनाशके यांची विशेष गरज लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च तर कमी होतोच शिवाय ते पर्यावरणास हानी पोचवणारे नसते म्हणूनच आदिम बियाणी ही शेती आणि अन्नसुरक्षेसाठी महत्वपूर्ण योगदान देतात.
स्थानिक आदिम बियाण्यांचा तेथील संस्कृतीवर मोठा प्रभाव असतो. भारतातील सणवार, परंपरा, रिवाज, धार्मिक अनुष्ठाने यांच्यावर शेतीचा मोठा पगडा दिसून येतो. संपूर्ण भारतात दिवाळी ही त्या वर्षीचा पडलेला उत्तम पाऊस आणि त्यामुळे आलेले खरिपाचे उत्तम पीक याचा आनंद साजरा करण्यासाठीच केली जाते. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर साजरे होणारे सण, धार्मिक परंपरा यात स्थानिक बियाण्यांचा मोठा वाटा असतो. उदा. कोकणातील एक वैशिष्ट्यपूर्ण सण दोरे सोडणे (गौरीच्या वौशाला बांधलेले दोरे दसऱ्यानंतर सोडतात.) या दिवशी आवर्जून धनेसाळ तांदळाची खीर /दिवे केले जातात. कारण, या तांदळाला उत्तम चव आणि चिकटपणा असतो. त्यामुळे दिवे न तुटता सहज बनतात. या स्थानिक बियाण्यांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांची माहिती स्थानिक लोकांना असल्यामुळे त्यांचा वापर त्यानुसार केला जातो. संशोधनातून हे सिद्ध झाले की, लाल तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात. कोकणात आजारी व्यक्तीला किंवा बाळंत झालेल्या बाईला लाल तांदळाची पेज देणे हे सर्वमान्य आणि सामान्यज्ञान आहे. वरीची लागवड ही डोंगरउतारावर बियाणी नुसती फेकून केली जाते. ऋषी पंचमीला बैलाच्या कष्टाचे अन्न खायचे नाही म्हणून वरीच्या भाकऱ्या केल्या जातात.
सर्व धान्यांमध्ये असलेल्या पोषणमुल्यांत म्हणजे कर्बोदके, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतूमय पदार्थ हे राळ्यामध्ये सर्वाधिक आढळून येतात शिवाय कोणत्याही जमिनीत आणि हवामानात राळा उत्पन्न देतोच. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये राळा हे आदिम धान्य हे शुभ शकूनाचे प्रतीक मानले गेले आहे. देवांच्या नैवेद्याला राळ्याची खीर आवर्जून केली जाते. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सवाष्ण स्त्रीच्या प्रेतयात्रेवर राळ्याच्या अक्षता वाहिल्या जातात. मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते तर ही लक्ष्मी लग्न होऊन सासरी जाताना माहेरच्या अंगणात समृद्धीचे प्रतीक म्हणून राळ्याचे दाणे मागे फेकत जाते, अशी परंपरा मध्य आणि उत्तर भारतात दिसून येते.
राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर बाजरी पिकवली आणि खाल्ली जाते. बाजरेकी रोटी, बाजरेका राब, बाजरेके लड्डू, देवाच्या नैवेद्याला बाजरेकी खीर असे अनेक पदार्थ राजस्थानी आहारसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला कालीदेवीला कोदोच्या (हरीक) खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तर ईशान्य भारतात होणारा अतिशय पौष्टिक तांदूळ ‘चकहाओ’ अर्थात् काळा तांदूळ हा केवळ तेथील राजा खायचा. चीनमध्येदेखील अशा प्रकारे होणारा काळा तांदूळ खास राजघराण्यासाठी राखीव होता.
भारतात परसबागेची सुरवात ही अक्षय तृतीयेला करतात. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेली अक्षय तृतीया ही नावाप्रमाणे या दिवशी सुरू केलेले एखादे कार्य निरंतर चालू राहते, अशी धारणा आहे. खरेतर, रब्बीची पिके घेतल्यानंतर शेताची पुन्हा मशागत करतानाच परसबागेचीही तयारी केली जाते. उन्हाळ्यात ताज्या भाज्यांचा पुरवठा व्हावा, या दृष्टिकोनातून वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला परसबागेत लागवडीला सुरवात केली जाते. घेवडा-वाल-पावटा हे भारतातील सर्व राज्यांमध्ये हमखास होणारे आणि भरपूर उत्पन्न देणारे पीक आहे. म्हणूनच कोकणात परसबागेमध्ये अक्षयतृतीयेला आळे तयार करून घेवडा-वाल-पावटा यांच्या बिया पेरल्या जातात.
अशा प्रकारे भारतीय कृषी संस्कृती आणि परंपरा, रिवाज, धार्मिक अनुष्ठाने ही एकमेकांत मिसळून गेली आहेत. त्यातील काही दुवे गळाले तर त्या सोबतच्या परंपरादेखील नष्ट होत जातात म्हणूनच शेती अधिक शाश्वत बनवण्यासाठी, कीड व्यवस्थापन करण्यासाठी, मानवी पोषण सुधारण्यासाठी आणि पर्यावरणीय परिसंस्थांचे संरक्षण होण्यासाठी आदिम बियाणांचे योगदान महत्वपूर्ण ठरते.
( लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)