Dog Bite : उल्हासनगरात वर्षाला 21 हजार श्वान दंशाचे धक्कादायक वास्तव, इंजेक्शनचा तुटवडा
esakal February 12, 2025 01:45 AM

उल्हासनगर - वर्षाला तब्बल 21 हजार श्वान दंशाच्या धक्कादायक वास्तवाची नोंद उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात झालेली आहे. अशातच रेबीज इंजेक्शनांचा तुटवडा असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी महानगरपालिकेला 9 पत्र पाठवून इंजेक्शन मिळण्यासाठीची मागणी केली आहे.

20 व्या पशू जनगणनेच्या नुसार शहरात भटक्या,पिसाळलेल्या श्वानांची संख्या 16 हजाराच्या वर असली तर ही आकडेवारी अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोनतीन वर्षांपासून श्वान दंशाच्या घटनेत कमालीची वाढ झालेली असून त्यात शाळेत विद्यार्थी ते वयोवृद्ध नागरिक श्वान दंशाचे शिकार झालेले आहेत.

शासकीय मध्यवर्ती रुग्णालय हे इंजेक्शन देण्याचे मुख्य केंद्र आहे. याठिकाणी आजूबाजूच्या शहरातील श्वान दंशाचे रुग्ण येत असतात.अंगावर शहारे आणणारी घटना म्हणजे सोमवारी 10 तारखेला या एकाच दिवशी श्वान दंशाचे 135 रुग्ण रुग्णालयात आले होते. तेव्हा हा प्रकार अधिकच ऐरणीवर आला. आणि रेबीज इंजेक्शनचा तुटवडा असल्याची कबूली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दररोज सरासरी 150 श्वान दंशाचे रुग्ण हे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात येत असतात. वर्षभरात हा आकडा तब्बल 21 हजाराच्या वर आहे.मात्र तेवढ्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध नसल्याने प्रशासन हातबल झाले आहे, महापालिका आयुक्तांनी यासाठी मदत करावी म्हणून 9 पत्र पाठवलेले आहेत. मात्र या पत्रांचे कोणतेही उत्तर वा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती डॉ.मनोहर बनसोडे यांनी दिली.

यासंदर्भात वैद्यकीय आरोग्य विभागाने अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.