E Peek Pahani : ई-पीक पाहणीचे कामकाज सातारा जिल्ह्यात ठप्प ; अंगणवाडी सेविकांच्या बहिष्कार; मदतीपासून शेतकरी राहणार वंचित
Agrowon February 12, 2025 01:45 AM

Satara News : कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकरी आपल्या शेतात जे पीक घेतात त्याची नोंद सरकार दरबारी व्हावी यासाठी केंद्र सरकारने ई-पीक नोंदणीची कार्यवाही गेल्या तीन वर्षांपासून सुरू केली आहे. ई-पीक नोंदणीअभावी शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागते. ई-पीक पाहणी करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही.

त्यामुळे सरकारने आता अंगणवाडी सेविकांची नेमणूक केली आहे. मात्र त्यांनीही त्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे ई-पीकपाहणी मुदतीत होणार की नाही याबाबत शंका आहे. ई-पीकपाहणी ऑनलाइन न झाल्यास मदतीपासून वंचितच राहावे लागणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने पीक नोंदणीतील गैरकारभाराला आळा बसावा, पिकांचे नुकसान झाले तर ज्यांचे नुकसान झाले ते बाजूला राहून अन्य शेतकऱ्यांना भरपाई मिळू नये आणि त्यात सुलभता यावी या हेतुने गेल्या तीन वर्षांपासून ई-पीकपाहणीची ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. ती नोंदणी करताना संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातून करावी लागते. त्यासाठी जीओ टॅगिंग करून त्याचे अक्षांश-रेखांश देण्यासाठी त्यातील पिकांचे फोटो ऑनलाइन अपलोड करावे लागतात. त्यामुळे हे काम सोपे नाही.

त्यासाठी पहिल्या टप्प्यात कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाची मदत घेण्यात आली. त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांनीकरावी, असे सांगितले. मात्र ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवरील शेतकऱ्यांकडे अॅन्ड्रॉईड मोबाइल नाहीत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रेंजच नसते. त्यामुळे त्या-त्या भागातील शेतकरी त्यापासून वंचित राहात असल्याचे सरकारचे लक्षात आले.

त्यासंदर्भात शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल सरकारने घेतली आहे. त्यामुळे सरकारकडून त्यासाठी आता अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांनी त्यांचे काम करून ई-पीक नोंदणीचेही काम करायचे आहे. त्यामुळे त्यांनी या कामाला विरोध केला आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी या कामावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे सध्या ई-पीकपाहणी ठप्प झाली आहे.

अंगणवाडी सेविकांच्या सुरक्षेचे काय?
ई-पीकपाहणी ही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन करावी लागते. अंगणवाडी सेविका ही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ई-पीक पाहणी करणार. त्यांना प्रत्येकाच्या शेतात जाणे शक्य नाही. त्याचबरोबर जरी त्या शेतात गेल्या तर तेथील सुरक्षेचे काय? तेथे काही अनुचित घटना घडली तर त्याला सरकार जबाबदार राहणार आहे का, असा सवाल अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.