क्रिकेटविश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बांगलादेशची महिला क्रिकेटपटू शोहेली अख्तर हिच्यावर आयसीसीकडून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२३ वर्ल्ड कप दरम्यान फिक्सिंगचे आरोप तिच्यावर करण्यात आले असून त्यामुळेच तिला या बंदीला सामोरे जावे लागत आहे.
३६ वर्षीय शोहेली हिने या आरोप मान्य केले आहेत, तसेच तिने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या पाच तरतुदींचे उल्लंघन केल्याचेही मान्य केले आहे. तिच्यावरील बंदीचा कालावधी १० फेब्रुवारी २०२५ पासून लागू करण्यात आला आहे.
तिने कलम २.१.१, २.१.३, २.१.४, २.४.४ आणि २.४.७ याचं उल्लंघन केलं आहे.
दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी अख्तरने तिच्या 'फ्रेंड'ला आणि संघसरकारी खेळाडूला फेसबुक मेसेंजर मार्फत संपर्क केला होता. तिने काही वॉइस नोट्स पाठवले होते, ज्यात ती संघसहकारी खेळाडूला बांगलादेशचे सामने भविष्यात फिक्स करण्यासाठी मनवत असल्याचे ऐकू येत आहे.
तसेच अख्तर हिने त्या खेळाडूला सांगितले की तिचा चुलत भाऊ (Cousin) त्याच्या फोनवरून बेटिंग करतो. त्याने तिला या संघसहकारी खेळाडूशी बोलायला सांगितले आहे आणि सांगितलं आहे की ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच वेगवान गोलंदाजीवर हिट विकेट होईल का? तसेच अख्तरने तिला त्याबदल्यात २ मिलियन बांगलादेशी टाका तिला मिळतील.
तसेच अख्तरने संघसहकारी खेळाडूला असंही सांगितलं होतं की जर २ मिलियन टाकास कमी असतील, तर तो आणखी २ मिलियन देईल. याशिवाय अख्तर हिने ही चर्चा गुपित ठेवण्यासही सांगितले होते, तसेच ही ऑफर स्वीकारायची की नाही, हे त्या संघसहकारी खेळाडूवर सोपवले होते. तसेच मेसेज डिलिटही करण्यास सांगितले होते.
आयसीसीच्या माहितीनुसार त्या संघसहकारी खेळाडूने ऑफर नाकारण्यासोबतच भ्रष्टाचार विरोधी युनिटकडे याबाबत माहितीही दिली होती. तिने वॉईस नोट्सचे पुरावेही सोपवले. त्यानंतर भ्रष्टाचार विरोधी युनिटच्या चौकशीत अख्तरने वॉईस नोट्स पाठवल्याने मान्य केले, पण तिने दावा केला की तिला तिच्या फ्रेंडला हे दाखवायचे होते की बांगलादेश संघातील सदस्य फिक्सिंगसारख्या गोष्टींमध्ये सामील नाही.
तिने हे मेसेजेस फक्त तिच्या आणि तिच्या फ्रेंडमधील चॅलेंज म्हणून पाठवले होते. तिने त्याबाबत स्क्रिनशॉट तयार करून सादर करेले होते. पण नंतर चौकशीनंतर हे स्पष्ट झाले की ते स्क्रिनशॉट्स १४ फेब्रुवारीनंतरचे होते. त्यानंतर अख्तरने तिने मेसेजेसबरोबर छेडछाड केल्याचे आणि दोन फोन वापरत असल्याचे मान्य केले. पण तिने दावा केला की जे मेसेज दिसत आहेत, ते खरे आहेत.
नंतरच्या चौकशीत तिने मान्य केले की ती त्या फ्रेंडसोबत गेल्या वर्षभरापासून संपर्कात होती आणि तिने असंही सांगितलं की २०२२ मध्ये तो कदाचित क्रिकेटच्या भ्रष्टाचारातही सामील होता.
तिच्यावर ज्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहेत, त्यात सामना, निकाल किंवा कोणतीही गोष्ट सामन्यातील फिक्स करणाऱ्या पक्षाशी संपर्कात असणे; दुसऱ्या खेळाडूला लाचची ऑफर देणे; दुसऱ्या खेळाडूला प्रवृत्त करणे; भ्रष्टाचार विरोधी युनिटला तिच्याशी कोणत्याही प्रकारचा चुकीचा संपर्क करण्यात येत असल्याचे न सांगणे, तसेच चौकशीदरम्यान चुकीची माहिती देणे, या गोष्टींचा समावेश आहे.