Stock Market Crash: शेअर बाजारात त्सुनामी; 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
esakal February 12, 2025 02:45 PM

Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात आज मंगळवारी सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 1,200 हून अधिक अंकांनी घसरला. त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांक 300 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे खासगी बँका आणि ऑटोमोबाईल क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. दुपारी 2 वाजता सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्स घसरणीसह व्यवहार करताना दिसले.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण

सेन्सेक्स 1122.63 अंकांच्या घसरणीसह 76,189.17 वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टी 50 देखील घसरला आणि तो 331 अंकांनी घसरून 23,050 च्या पातळीवर आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

निफ्टी मिडकॅप 3% आणि निफ्टी स्मॉलकॅप 4% घसरला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 9.68 लाख कोटी रुपयांनी घसरून 408.88 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

शेअर बाजार का घसरत आहे?

शेअर बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री. अमेरिकन बाजारातील अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत पैसे काढून घेत आहेत. खरं तर अमेरिकेने स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25% आयात शुल्क लादल्याने व्यापार युद्धाची भीती वाढली आहे. त्याचा परिणाम थेट शेअर बाजारात दिसून येत आहे. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे रुपयाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे.

कोणत्या शेअर्सवर सर्वाधिक परिणाम झाला?

पॉवर ग्रीड, झोमॅटो, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फिनसर्व्हमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी झोमॅटोच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 5 टक्क्यांची घसरण दिसून आली. आयशर मोटर्सचे शेअर्स जवळपास 7 टक्क्यांनी घसरले कारण त्याचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा कमी आले होते.

सुरू असलेल्या घसरणीदरम्यान निफ्टी ऑटो, मीडिया, फार्मा, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, हेल्थ केअर आणि ऑईल आणि गॅस क्षेत्रात एक ते दीड टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लार्जकॅप कंपन्यांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

भविष्यात शेअर बाजाराची दिशा कशी असेल?

चॉईस ब्रोकिंगचे इक्विटी रिसर्च ॲनालिस्ट आकाश शाह यांनी सांगितले की, निफ्टीचा रझिस्टंट 23,460 अंकांवर आहे. ही पातळी ओलांडल्यास निफ्टी 23,550 आणि 23,700 पर्यंत वाढू शकतो. ही पातळी तुटल्यास तो 23,000 पर्यंत घसरू शकतो.

दरम्यान फेडरल रिझर्व्हचे (फेड) चेअरमन जेरोम पॉवेल यांनी अमेरिकन सिनेटमध्ये दिलेल्या वक्तव्याचाही बाजारावर परिणाम होणार आहे. महागाई आणि व्याजदर याबाबत ते आपले मत मांडणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.