SN Subrahmanyan: 'कामगार काम करण्यास तयार नाहीत'; 90 तासांच्या वक्तव्यानंतर L&Tच्या अध्यक्षांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
esakal February 12, 2025 10:45 PM

L&T Chairman SN Subrahmanyan: लार्सन अँड टुब्रोचे (L&T) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी भारतातील बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या स्थलांतरामध्ये घट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी यामागील प्रमुख कारण सांगितले की, सरकारी कल्याणकारी योजना आणि आरामदायी जीवनशैलीची वाढती पसंती हे आहे.

CII Mystic South Global Linkages Summit 2025 मध्ये चेन्नई येथे बोलताना सुब्रह्मण्यन यांनी बांधकाम क्षेत्रात कामगारांची भरती आणि त्यांचे व्यवस्थापन करणे अधिक कठीण होत असल्याचे सांगितले.

"आमच्या कंपनीत सुमारे 2.5 लाख कर्मचारी आणि 4 लाख बांधकाम कामगार काम करतात. कर्मचाऱ्यांची घटती संख्या चिंतेची गोष्ट आहे, पण त्याहून अधिक काळजी मजुरांच्या उपलब्धतेबाबत आहे," असे सुब्रह्मण्यन यांनी Business Today ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

"कामगार आता संधीसाठी स्थलांतर करण्यास तयार नाहीत. कदाचित त्यांचे स्थानिक अर्थव्यवस्थेत चांगले चालले आहे, कदाचित त्यांना मिळणाऱ्या विविध सरकारी योजनांमुळे किंवा थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेमुळे त्यांना स्थलांतर करण्याची गरज भासत नाही," असे ते म्हणाले.

L&T मध्ये मजुरांची भरती आणि व्यवस्थापन यासाठी स्वतंत्र HR टीम आहे. मात्र, या प्रयत्नांनंतरही कामगार शोधणे आणि त्यांना टिकवून ठेवणे ही मोठी अडचण बनली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतात कुशल व अर्ध-कुशल कामगारांचा तुटवडा

भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात कुशल व अर्ध-कुशल कामगारांची कमतरता जाणवत आहे, ज्याचा थेट परिणाम प्रकल्पांवर होऊ शकतो. सुब्रह्मण्यन यांनी हेही नमूद केले की केवळ ब्लू-कॉलर (हाताने काम करणारे) कामगारच नव्हे, तर उच्च पदस्थ कर्मचारीदेखील स्थलांतर करण्यास तयार नाहीत.

"मी जेव्हा L&T मध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर म्हणून कामाला लागलो, तेव्हा माझ्या बॉसने मला सांगितले की तू जर चेन्नईचा असशील, तर दिल्लीला जाऊन काम कर. पण आज जर मी चेन्नईच्या एखाद्या कर्मचाऱ्याला दिल्लीला जायला सांगितले, तर तो थेट नकार देतो. कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या HR धोरणांमध्ये अधिक लवचिकता आणावी लागेल," असे त्यांनी सांगितले.

90-तास कामाच्या वक्तव्यावरून वाद

यापूर्वी सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात 90 तास काम करण्याचे समर्थन केले होते, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

"मला दु:ख आहे की मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकत नाही. जर रविवारी काम करायला लावू शकलो, तर मला खूप आनंद होईल, कारण मी स्वतः रविवारी काम करतो," असे त्यांनी पूर्वीच्या वक्तव्यात म्हटले होते.

तसेच "तुम्ही घरी बसून काय करणार? किती वेळ बायकोकडे बघत राहणार? ऑफिसमध्ये या आणि काम करा," असे विधान करून त्यांनी वादाला तोंड फोडले होते.

कंपन्यांना नवे धोरण राबवावे लागणार

सध्याच्या बदलत्या परिस्थितीत L&T सारख्या मोठ्या कंपन्यांना नव्या पद्धतीने कामगार भरती व व्यवस्थापन करावे लागणार आहे. बदलत्या आर्थिक व सामाजिक घटकांमुळे स्थलांतर आणि रोजगाराच्या संधींबद्दल कामगारांची मानसिकता वेगळी झाली आहे, त्यामुळे कंपन्यांनी नवीन धोरण अवलंबण्याची गरज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.