चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 353 धावांचं बलाढ्य आव्हान दिलं होतं.खरं तर हे आव्हान पाकिस्तान गाठणार नाही असंच वाटत होतं. पण हे आव्हान पाकिस्तानने 6 गडी आणि 6 चेंडू राखून पूर्ण केलं. पाकिस्तानचा विकेटकीपर आणि कर्णधार मोहम्मद रिझवान याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. नाबाद 122 धावा करत संघाला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. त्याला मधल्या फळीतील सलमान आघाची उत्तम साथ मिळाली. ट्राय सिरीजमध्ये न्यूझीलंडने आधीच अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीचा सामना 14 फेब्रुवारीला होणार असून पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहे. यापूर्वी साखळी फेरीत न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. आता पराभवाचा वचपा काढून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज होणार का? हा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
दक्षिण अफ्रिकेचे सर्वच गोलंदाज फेल गेले असंच म्हणावं लागले. त्यातल्या त्यात वियान मल्डरने 2, तर लुंगी एनगिडी आणि कॉर्बिन बॉचने प्रत्येकी एक गडी बाद केला. पाकिस्तानकडून फखर जमान आणि बाबर आझम यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. बाबर आझम बाद झाल्यानंतर तीन गडी झटपट बाद झाले. पण त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सलमान अघा यांनी डाव सावरला आणि विजय मिळवून दिला.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान म्हणाला की, ‘सर्वांना माहिती आहे की क्रिकेटमध्ये काही होईल सांगता येत नाही. विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करण्यात आम्हाला मदत केल्याबद्दल सर्वशक्तिमान देवाचे आभार. मला वाटले होते की आम्ही त्यांना 300 पर्यंत रोखू शकू पण क्लासेन ज्या पद्धतीने खेळला त्यामुळे तो त्यांना 350 पर्यंत घेऊन गेला. जेव्हा आम्ही आमची गोलंदाजी संपवून परत जात होतो, तेव्हा काही खेळाडूंनी आम्हाला आठवण करून दिली की आम्ही यापूर्वी अशा धावसंख्येचा पाठलाग केला आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. मला मिसफील्डिंगमुळे राग येत येतो. चॅम्पियन्स ट्रॉफी येत असताना आमचे क्षेत्ररक्षण सुधारले पाहिजे.’