नवी दिल्ली : ‘‘तुमच्या तणावामागचे कारण शोधून काढा अन् ज्याच्यावर तुमच्या विश्वासू व्यक्तीला त्याची कल्पना द्या,’’,असा सल्ला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना दिला. बुधवारी प्रसारित झालेल्या पंतप्रधान मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात दीपिकानेही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांआधी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. या कार्यक्रमात सहभागी होऊन दीपिकाने एका खास सत्रात विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य तणाव व्यवस्थापन, परीक्षेला शांत चित्ताने कसे सामोरे जावे या विषयावर मार्गदर्शन केले.
मोदी दरवर्षी ‘टाऊन हॉल’मध्ये विद्यार्थ्यांशी या उपक्रमांतर्गत संवाद साधतात. यंदा पंतप्रधानांनी अधिक अनौपचारिक वातावरणात संवाद साधण्यास प्राधान्य दिले. यावेळी त्यांनी बोर्ड परीक्षांच्या आधी दिल्लीतील प्रसिद्ध ‘सुंदर नर्सरी’त खुल्या वातावरणात विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी दीपिका पदुकोणने स्वतःच्या आयुष्यात आलेल्या नैराश्याच्या काळात केलेल्या संघर्षाची, त्यातून शोधलेल्या मार्गांची माहिती दिली. तसेच आपल्यातील बलस्थानांमधून आनंद मिळवण्यास शिकण्याचा सल्लाही तिने दिला.
या उपक्रमातील विशेष सत्रात दीपिकाने सांगितले, की स्पर्धा आणि तुलना ही आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. स्पर्धा ही वाईट बाब नाही. मात्र, तिला सामोरे जाताना तुम्ही तुमची बलस्थानं आणि कमजोर बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. तुमच्या बलस्थानांवर अधिक लक्ष केंद्रित करताना कमजोर बाबींवरही कशी मात करता येईल, यावर भर दिला पाहिजे. तणाव व्यवस्थापन करून तो हलका करण्यासाठी आपल्या पालकांशी सुसंवाद साधा. परीक्षेच्या आदल्या रात्री त्यांच्याशी मनमोकळे बोला.
२०१५ मध्ये मला नैराश्य विकार (डिप्रेशन) झाल्याचे निदान झाले होते, असे सांगून दीपिका म्हणाली, की एक काळ असा होता जेव्हा भारतात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता नव्हती. त्याविषयी उघडपणे बोललेही जात नव्हते. आपल्या देशात मानसिक आरोग्य हा एक कलंक मानला जात होता. मी या आजाराबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात करताच मला खूप मोकळे, हलके वाटू लागले.
तिथून मानसिक आरोग्य जागृतीच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला. नैराश्य, चिंता, ताणाचा त्रास कोणालाही, कधीही होऊ शकतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे - ‘स्वतःला व्यक्त करत जा, कधीही दमन करू नका’. जेव्हा तुम्ही परीक्षेची नियमित तयारी करता तेव्हा तुम्हाला आतूनच बरे वाटू लागते अन् तुम्ही अधिक आनंदी, समाधानी, निरोगी जीवन जगू शकता.
चांगली झोप घ्या, योग्य प्रमाणात पाणी प्या, व्यायाम करा आणि ध्यानधारणाही करा. मुख्य म्हणजे इतरांऐवजी स्वतःशीच स्पर्धा करा. स्वतःलाच आव्हान द्या अन् त्यावर मात करा, असा सल्लाही दीपिकाने दिला. यावेळी प्रसिद्ध मुष्टियोद्ध्या एम. सी. मेरी कोम आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरू यांनीही जीवनाच्या महत्त्वाच्या पैलूंबाबत आपल्या अनुभवी ज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
तीन कळीचे मुद्देएका विद्यार्थ्याने मानसिक आरोग्याची नेमकी कशी काळजी घ्यावी, असे विचारले, तेव्हा दीपिकाने त्याबाबत तीन कळीचे मुद्दे (टिप्स) सांगितले. ती म्हणाली, की झोप खूप महत्वाची आहे. पुरेसा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा मिळविण्यासाठी तुम्ही बाहेर नियमित फिरायला गेले पाहिजे. अन् गरज वाटल्यास नेहमी मदतीसाठी योग्य व्यक्तीशी संपर्क साधला पाहिजे व त्याच्याशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे. संयम हाही एक महत्त्वाचा गुण आहे. आपण आपले नियंत्रण ज्याच्यावर आहे किंवा आपल्या आवाक्यातील गोष्टीच आपण करू शकतो, याची जाणीव ठेवा.