Solapur : वैराग येथे पोलिस कॉन्स्टेबलने संपवले जीवन; हळहळ हाेतेय व्यक्त
esakal February 13, 2025 05:45 PM

वैराग : सोलापूर येथे कार्यरत असलेले व वैराग (ता. बार्शी) येथे राहणारे पोलिस कॉन्स्टेबल महेश पाडुळे यांनी बुधवारी (ता. १२) सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वैराग पोलिसात आकस्मित मयत म्हणून नोंद झाली आहे.

महेश जोतीराम पाडुळे (वय ४५) हे मूळचे अंजनगाव (ता. माढा) येथील रहिवासी. सोलापूर मुख्यालयात कार्यरत होते. यापूर्वी ते वैराग पोलिस ठाण्यात नोकरीस होते. त्यामुळे ते वैराग येथेच राहत होते. वैराग येथे त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला असता त्यांना वैराग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबतची माहिती डॉ. सागर शिंदे यांनी वैराग पोलिसांत दिली आहे. महेश पाडुळे यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा एक लहान मुलगा आणि सहा वर्षांची एक मुलगी असा परिवार आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव हे करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.