सांगली : सांगली जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन मृत झालेल्या ५ हजार ४९७ शेतकऱ्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटिसा देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तब्बल ५२ कोटी रुपये थकित आहेत. थकीत ५९ हजार शेतकऱ्यांपैकी ४० हजार शेतकऱ्याना नोटीसा बजावल्या आहेत. बँक प्रशासन मृतांचे वारसांचे पत्ते शोधून नोटीसा बजावत आहे. तर आतापर्यंत ३२५ मृत शेतकऱ्याच्या वारसांना नोटिसा दिले असून ७० लाख रुपये वसुलीही झाली आहे.
आर्थिक वर्ष समाप्तीवर आले आहे. अर्थात ३१ मार्च अवघ्या दीड महिन्यावर आला आहे. कोणत्याही परिस्थितीत एनपीए कमी करण्यासह अडीचशे कोटी रुपये नफ्यासाठी आत्तापासून थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून बड्या नेत्यांच्या संबंधित पाच सूत गिरण्यासाठी लिलाव नोटीस काढले आहेत. त्याचबरोबर मृत शेतकऱ्यांसह थकबाकीदार शेतकऱ्यांनाही नोटीस बजावल्या जात आहेत.
वारसांचा शोध घेऊन नोटीस
जिल्हा विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून कर्ज वाटप करते. यामध्ये ५ हजार ४९७ कर्जदार मृत आहेत. त्यांच्याकडील ५२ कोटी रुपये थकीत वसुलीसाठी फारसे कोणी प्रयत्न करीत नव्हते. मात्र गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या वारसांना नोटीसा देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. त्यांचे मृतांची वारसा शोधून नोटीस दिल्या जात आहेत.
सातबारावर नावे लावून नोटीस
वसुलीच्या अनुषंगाने बँक कर्मचारी प्रसंगी तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला जात आहे. राहत्या घरावर वारसांची नावे लावली असतील तर जमिनीच्या सातबारावर नावे लावून त्यांना नोटीसा दिल्या जात आहेत. बँकेकडून आतापर्यंत ३२५ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना नोटीस बजावत ७० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर मार्च अखेर वसुलीसाठी सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू ठेवले आहे.