Dnyanradha Society : लेखा परीक्षकांचा काणाडोळा, ठेवीदारांचा घात; 'ज्ञानराधा'कडून फसवणुकीचे प्रकरण
esakal February 13, 2025 05:45 PM

दत्ता देशमुख

बीड : ‘ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटी’च्या राज्यभरातील सर्व शाखांचा बहुतांशी ठेवींचा पैसा येथील जालना रोड शाखेत वळवून कुटे व तिरुमला उद्योग समूहाच्या विविध उद्योगांना अब्जावधींचे कर्ज घेतले गेले.

दरवर्षी होणाऱ्या लेखा परीक्षणात लेखापरीक्षकांनी कुटेसोबतच्या हितसंबंधांपेटी डोळेझाक केली आणि त्यामुळेच ठेवीदारांचा घात झाल्याचे स्पष्ट होत आहे. एक्सपोजर लिमिट आणि संचालकांच्या इतर संस्थांना कर्जाबाबत वेळोवेळी अक्षेप नोंदवून केंद्रीय लेखा परीक्षण विभागाला कळविले असते, तर कदाचित लाखो ठेवीदार वाचले असते, असे बोलले जात आहे.

‘ज्ञानराधा’च्या जालना रोड शाखेतून सुरेश कुटे व अर्चना कुटे यांच्या कुटे व तिरुमला उद्योग समूहाच्या विविध उद्योगांना तब्बल ३ हजार ५४५ कोटींचे कर्ज वाटप झाल्याचे समोर आले आहे. ‘ज्ञानराधा’कडून ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी ५६ गुन्हे नोंद आहेत. आर्थिक गुन्हे शाखा, सक्तवसुली संचालनालय, सहकार विभागाचे अवसायक या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेने कुटे संबंधित ५ हजार ७६५ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या असून, यातीलच २ हजार ३०८ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींच्या ८० जंगम, स्थावर मालमत्तांच्या ‘एमपीआयडी’चा प्रस्ताव अपर पोलिस महासंचालकांना पाठविला. सुरेश कुटे, आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी आदींसह संचालक व अधिकारी अद्यापही कोठडीत आहेत. अर्चना कुटे फरारी आहे.

संचालकांच्या कर्जाकडे काणाडोळा

सुरेश कुटेने २००३ मध्ये ‘ज्ञानराधा’ची स्थापना केली. वर्ष २००८ मध्ये या संस्थेला मल्टिस्टेटचा दर्जा मिळवून महाराष्ट्रासह मध्य प्रदेशपर्यंत विस्तार करण्यात आला. दरम्यान, कुठल्याही संस्थेचे दरवर्षी सनदी लेखापालाकडून लेखा परीक्षण अनिवार्य असते. लेखा परीक्षकांचे शुल्क जरी संबंधित संस्था मोजत असली तरी लेखा परीक्षणातील त्रुटींची पूर्तता त्या संस्थेकडून करून घेणे, गंभीर बाबी आढळल्यानंतर त्याचा अक्षेप अहवाल संबंधित विभागाला पाठविणे लेखा परीक्षकांची जबाबदारी असते.

‘ज्ञानराधा’चे लेखा परीक्षण करताना त्या त्या वर्षी लेखा परीक्षकांनी संस्थेला ठेवी किती आल्या व कर्ज किती दिले याचा ताळेबंद तपासणे गरजेचे होते. एकूण ठेवीच्या ७० टक्के कर्ज वाटप व्हावे, २० टक्के रक्कम सुरक्षित निधी म्हणून इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांत असावी, १० टक्के खेळते भांडवल असणे गरजेचे आहे.

तसेच, संबंधित संस्थांच्या संचालकांच्या नातेवाइकांच्या संस्थांना कर्ज देता येत नाही, तरीही कर्ज दिले जात होते. हे आक्षेप लेखा परीक्षकांनी त्या त्या वेळी नोंदविले का, तसा अहवाल केंद्रीय लेखा परीक्षण विभागाला पाठविला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचवेळी ही प्रक्रिया पार पडली असती तर कदाचित लाखो ठेवीदारांची फसवणूक टळली असती, असे बोलले जात आहे.

एकूण ठेवी ३ हजार ७१५ कोटी तर कर्ज ३ हजार ५५० कोटी रुपये आहे. म्हणजे सीडी रेशोही सांभाळलेला नाही. सुरेश कुटे व अर्चना कुटे ‘ज्ञानराधा’चे अध्यक्ष व संचालक असताना त्यांच्याच उद्योगांना ३ हजार ५४५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले. ही बाबही परीक्षणात नोंदवली गेली नाही का? वारंवार तो त्याच्याच उद्योगांना कर्ज घेत गेला आणि ‘ज्ञानराधा’ बुडाली.

कुटेच्या घरातून जनरेटर चोरीचा प्रयत्न

बीड, ता. १२ : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या सुरेश कुटे यांच्या घरातून जनरेटर चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी (ता. १२) समोर आला. उशिरापर्यंत पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु होती. औद्योगिक वसाहत ते बाजार समिती रस्त्यावर तिरुमला कार्यालयाच्या पाठीमागे सुरेश कुटे यांचे निवासस्थान आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात सुरेश कुटे सात महिन्यांपासून कोठडीत आहे. तर अर्चना कुटे फरार आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी काही लोकांनी त्यांच्या घरासमोर असलेले जंबो जनरेटर क्रेनच्या साहाय्याने टेम्पोत टाकले आणि घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. याबाबत परिसरातील नागरिकांनी विचारणा केल्यानंतर आमचे कुटेकडे पैसे असल्याचे त्यांनी सांगितले. जनरेटर असलेला टेम्पो (एम.एच. १२, ई. क्यू. २८४१) लोकांनी अडविला. याबाबत पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु होती. याबाबत पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांना विचारले असता तक्रार नोंदविण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.

लेखा परीक्षण करताना एक्स्पोजर लिमिट (कर्जाची मर्यादा), सीडी रेशो तपासणे गरजेचे आहे. तसेच, वित्तीय संस्थांच्या संचालकांच्या संबंधित इतर संस्था किंवा उद्योगांना कर्ज देण्यावरही बंधने आहेत. या बाबी लेखा परीक्षण अहवालात नमूद होऊन त्याचा अहवाल केंद्रीय लेखा परीक्षण संचालकांना पाठविणे लेखा परीक्षकांवर बंधनकाकर असते.

- बी.बी. जाधव, सनदी लेखापाल बीड.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.