विटा : जागेचा वाद व ‘यू ट्यूब’वर बातमी प्रसारित केल्याचा राग मनात धरून प्रसाद प्रकाश पिसाळ (वय ३३, विटा) यांच्यावर कोयताने वार करत खुनीहल्ला करण्यात आला. मंगळवारी (ता. ११) रात्री पावणेआठच्या सुमारास त्यांच्या विटा-मायणी रस्त्यालगत असलेल्या कार्यालयात ही घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली. जखमी पिसाळ यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित राहुल जाधव, सागर भानुदास चोथे व विनोद सावंत (तिघे विटा), सुनील पवार (लेंगरे, ता. खानापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, संशयित राहुल जाधव व सुनील पवार (२६) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पवार यास अटक करून आज विटा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी शुक्रवारपर्यंत ( १४) पोलिस कोठडीचा आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संशयितांपैकी एकजण हद्दपार गुंड असल्याचे समोर आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की प्रसाद पिसाळ व सहकारी कर्मचारी सुषमा जोशी हे मायणी-विटा रस्त्यालगत असलेल्या कार्यालयात थांबले होते. संशयित दोघे तिथे आले. त्यांच्या हातात शस्त्रे होती. राहुल जाधव याने कोयता, तर सुनील पवार याने स्टीलच्या रॉडने प्रसाद पिसाळवर हल्ला चढवला. अन्य दोघांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचे समोर आले. या हल्ल्यात पिसाळ यांच्या हात, डोके, पाठ व पायावर गंभीर इजा झाली. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. आरडाओरडा होताच संशयित पसार झाले.
दरम्यान, प्रसाद यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवण्यास गेलेल्या कर्मचारी सुषमा जोशी यांनाही मारहाण करून जखमी केले. पिसाळ यांच्यावर विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. दोघांना तातडीने अटक करण्यात आली आहे. एक संशयित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला याआधी हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीनंतर तो पुन्हा शहरात फिरत होता, असे पोलिसांनी सांगितले.
घटना गंभीर व निंदनीय आहे. पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेत कारवाई सुरू केली आहे. संशयितांना कठोर शासन होण्यासाठी पाठपुरावा करू. पत्रकार, नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू.
-रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक, सांगली