Akashvani : मन का रेडिओ बजने दे जरा; लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचते 'आकाशवाणी'
esakal February 13, 2025 08:45 PM

नागपूर : सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आणि विविध दृकश्राव्य वाहिन्यांच्या धबडग्यातही आपले अस्तित्व आकाशवाणीने टिकवून ठेवले आहे, नव्हे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकाशवाणी आजही दररोज लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचते आहे.

पूर्वी केवळ मध्यम लहरींच्या माध्यमातून ठराविक अंतरापर्यंतच रेडिओचे कार्यक्रम ऐकता यायचे. आता मात्र आकाशवाणीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या मर्यादांवर मात केली असून न्यूज ऑन एआयआर ॲप, यु ट्युब, इन्स्टा, फेसबुक आदी माध्यमातून आकाशवाणीचे कार्यक्रम जगभर ऐकले जातात.

अलिकडे चारचाकी गाड्यांमध्येही रेडिओ असतो आणि ऐकला जातो. पूर्वी केवळ रेडिओ सेटवरच ऐकले जाणारे आकाशवाणीचे कार्यक्रम आता मोबाईलवरही ऐकता येतात. शेतात झाडाला ट्रांन्झिस्टर अडकवून शेतीविषयक कार्यक्रम ऐकणारा शेतकरी आता मोबाईलवर रेडिओचे कार्यक्रम ऐकतो. चहाच्या टपरीवर, छोट्या दुकानांमध्ये आजही आकाशवाणीचेच कार्यक्रम ऐकले जातात.

‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेल्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे प्रसारण भारतात १९३६ सालापासून सुरू झाले. नव्वदीच्या घरात असलेल्या आकाशवाणीची लोकप्रियता आजही कायम असण्याचे कारण आकाशवाणीवरील कार्यक्रमांची विविधता आणि गावखेड्यातही असलेला आकाशवाणीचा श्रोता. मराठी-हिंदी गाण्यांपासून ते शास्त्रीय-सुगम संगीतापर्यंत, शेतीविषयक कार्यक्रमांपासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत, बाल, युवा, ज्येष्ठांपासून ते महिलांपर्यंत साऱ्यांसाठीच विविध कार्यक्रम सादर करणारे श्राव्य माध्यम म्हणजे आकाशवाणी.

‘जयमाला’ आजही लोकप्रिय

वाहिन्यांच्या धबडग्यातही विश्वासार्हतेचा मुद्दा आला की पहिली पसंती आकाशवाणीच असते. पूर, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये विश्वासार्ह बातम्या पुरविण्याचे काम आकाशवाणीने नेहमीच केले आहे. घरा-दारापासून दूर सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकापर्यंत पोहोचते, आकाशवाणी. ‘जयमाला’ हा कार्यक्रम आकाशवाणीवरून खास सैनिकांसाठी वर्षानुवर्ष सादर केला जातो आहे. आणि आजही तेवढाच लोकप्रिय आहे.

आकाशवाणीने काळाबरोबर आपली कार्यपद्धती बदलली आहे. पूर्वी पत्रांच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधणारी आकाशवाणी आता फोन इन कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रोत्यांशी जुळलेली आहे. आता श्रोत्यांचा सहभाग असलेले कार्यक्रम अधिक ऐकवले जातात. बदलत्या काळाबरोबर श्रोत्यांशी अधिकाधिक कनेक्ट होण्याचा परयत्न आकाशवाणी करते.

-प्रियदर्शिनी राऊत, सहायक निदेशक, आकाशवाणी, नागपूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.