(शिक्षकाचे चित्र वापरावे)
जिल्ह्याला साडेतीनशे प्राथमिक शिक्षक
दुसऱ्या टप्प्यातील भरती लवकरच ; रिक्त पदांची संख्या घटणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन तत्कालीन सरकारने केलेल्या शिक्षक भरतीत रत्नागिरी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात सुमारे १३०० शिक्षक मिळाले होते. दुसऱ्या टप्प्यातील भरतीप्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे अजून साडेतीनशे शिक्षक जिल्ह्यात भरले जातील, अशी शक्यता आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांची भरतीप्रक्रिया रखडल्यामुळे रिक्त पदांची संख्या दोन हजारावर पोचली होती. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला होता. ग्रामीण भागात शिक्षक नियुक्त करताना शिक्षण विभागाला कसरत करावी लागत होती. अनेक शाळांवर कामगिरीने शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या गेल्या होत्या. नियमित अभ्यासक्रम शिकवतानाच अन्य कामे करणे शिक्षकांची अडचण होत होती. याबाबत वाढता दबाव लक्षात घेऊन तत्कालीन महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी शिक्षकभरतीचा निर्णय घेतला. त्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे अर्ज मागवण्यात आले होते. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन घेण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेने एकूण जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती; मात्र बिंदूनामावलीतील तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन राज्यशासनाने ७० टक्के जागाच भरण्याचे आदेश काढले. त्यामुळे रत्नागिरीला १५० शिक्षक कमी मिळाले. पहिल्या टप्प्यात सुमारे तेराशे जणांना नियुक्तीपत्र काढले होते. त्यातील सुमारे दीडशे ते दोनशे उमेदवार अनुपस्थित होते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील रिक्त पदे मिळून सुमारे साडेतीनशे पदे भरण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू केली जाणार आहे. ही प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे, प्रस्ताव मागविणे ही प्रक्रिया केली जाणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सुमारे १ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही शाळांमध्ये अजूनही कामगिरीवर शिक्षक काढले जात आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या चार ते पाच वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढलेली आहे तसेच आंतरजिल्हा बदलीने जाणारे शिक्षकही अधिक आहेत. परिणामी, रिक्त पदांची संख्या वाढत आहे. त्यासाठी आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडू नये, अशी मागणी केली जात आहे.
---
कोट
रिक्त जागांवर नवीन शिक्षकांची पदे तातडीने भरली गेली पाहिजेत. त्यामुळे बॅकलॉग भरून निघेल तसेच विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल; मात्र कंत्राटी शिक्षक ज्या शाळांमध्ये भरलेले आहेत ते सर्व स्थानिक आहेत. त्यांच्या नेमणुका रद्द होणार नाहीत, याची काळजी शासनाने घेतली पाहिजे.
- दीपक नागले, माजी शिक्षण सभापती