विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहील राजन साळवी, असा बॅनर वाचला. तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंना धक्का देत माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
आज ठाण्यामध्ये त्यांनी यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला कोकणातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधन करताना ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले यांच्याप्रमाणे काव्य रचत ठाकरेंना टोला मारला.
पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, 'विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहील राजन साळवी, असा बॅनर वाचला. तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी. कोकणातला ढाण्या वाघ पुन्हा एकदा शिवसेनेच्या गुहेमध्ये आला आहे. आता देखील ते आमदार झाले असते. राजन साळवी यांना तिकीट द्या असे किरण सामंत म्हणाले होते. या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल. राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वो आगे जाएगा' असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला डिवचलं.