चाकण, ता.२३ : येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात नव्याने काढणी केलेल्या कांद्याची शनिवारी (ता.२२) सुमारे ३५ हजार गोण्यांची (साडे सतरा हजार क्विंटल) आवक विक्रीसाठी आली आहे. त्यास कांद्यास प्रतिकिलोस घाऊक बाजारात १८ ते २७ रुपये बाजारभाव मिळत आहे. बाजारभाव पाच ते आठ रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.
नवीन काढणी केलेला कांदा नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यातील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. शेतकरी कांदा काढणी केल्यानंतर तो लगेच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत त्यामुळे कांद्याची आवक वाढत आहे. परिणामी कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. कांद्याचे भाव तीस, पस्तीस रुपयावरून २० ते २७ रुपयांवर आलेले आहेत. हे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. कांद्याचे बाजारभाव आवक वाढली तर अजून घसरतील असे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, सचिव बाळासाहेब धंद्रे आणि बाजारात आलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
विविध जिल्ह्यांत कांदा काढणीला वेग
पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यात कांद्याची काढणी वेगात सुरू आहे. चाकण परिसरातील कांदा हा गरवा जातीचा असतो त्यामुळे तो निर्यातीसाठी योग्य असतो. निर्यातीसाठी कांदा मागणी असल्याने निर्यातदार व्यापारी, कंपन्या चाकण बाजारात कांदा खरेदीसाठी येत आहेत.दिल्ली,उत्तर प्रदेश, चेन्नई येथील व्यापारी बाजारात कांदा खरेदीसाठी येत आहेत, असे विक्रम शिंदे जमीरभाई काजी, राम गोरे, प्रशांत गोरे पाटील आदींनी सांगितले.
सध्या राज्यात कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामातील कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी येत आहे. कांद्याचे भाव घसरले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य शासनाने,केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यावे निर्यात वाढवावी.
- माणिक गोरे, संचालक, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती
08137