47132
माणगाव आंबेडकर विद्यालयास ‘आयएसओ’
९००१-२०१५ प्रमाणपत्र ः सुवर्ण महोत्सव दिनानिमित्त सन्मान
कुडाळ, ता. २३ ः तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणगावला मान्यवरांच्या हस्ते आयएसओ मानांकन व ९००१-२०१५ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शाळेला समाजाचा आधार असावा आणि समाजाला शाळेचा अभिमान असावा, या उक्तीप्रमाणे या शाळेचे पालक, ग्रामस्थ एकत्र आले. औचित्य होते शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे. १६ फेब्रुवारी १९७५ मध्ये स्थापन ही शाळा पन्नास वर्षांपासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होती. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने सर्व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी एकत्र येऊन सुवर्ण महोत्सवी संयोजन समिती स्थापन केली. शाळा विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी संकलन करून शाळेचा जीर्णोद्धार केला. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि पालक, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थांकडून शाळेसाठी लोकवर्गणी गोळा केली. वर्षभरात ४५ लाख रुपये खर्चून शाळेची नवीन इमारत व इतर सुविधा दिल्या आहेत.
यासाठी मुख्याध्यापिका संजना पेडणेकर आणि उपशिक्षक बाबाजी भोई आदींनी परिश्रम घेतले. शाळेच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून शाळेला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मुख्याध्यापिकांकडे सुपूर्द केले. व्यासपीठावर अध्यक्ष नागेश कदम, भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, सरपंच मनीषा भोसले, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, वा. स. विद्यालय माणगावचे अध्यक्ष सगुण धुरी, माजी सभापती मोहन सावंत, माणगाव वाचनालय अध्यक्ष स्नेहल फणसळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक नानचे, उपाध्यक्ष वेदांती कदम, सुवर्ण महोत्सव कमिटी उपाध्यक्ष योगेश गुंजाळ, पंच अवधुत गायचोर, निवृत्त शिक्षक बुधाजी कांबळी सहायक शिक्षक बाबाजी भोई आदी उपस्थित होते. बाबाजी भोई यांनी सूत्रसंचालन केले. दीपक नानचे यांनी प्रास्ताविक केले. संजना पेडणेकर यांनी आभार मानले.