47143
‘कोमसाप’ची चळवळ पुढे नेऊया
मंगेश मसके ः कुडाळात ‘भाकरी आणि फूल’ कवी संमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः ऐक्य व सहकार्याने काम करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘कोमसाप’च्या रुपाने साहित्यिक चळवळ पुढे नेऊया. पद्मश्री मधूभाईंचे स्वप्न साकार करूया, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केले. कोमसाप कुडाळ शाखेच्या ‘भाकरी आणि फूल’ कवी संमेलनात उपस्थित साहित्यप्रेमींना प्रबोधित करताना ते बोलत होते.
कुडाळ कोमसाप शाखेने जिल्ह्यातील तालुका शाखांच्या कार्यकारिणी सदस्यांचा मेळावा व ‘भाकरी आणि फूल’ हे कवी संमेलन आयोजित केले. शाखाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष मसके, जिल्हा कार्यवाह विठ्ठल कदम, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, जिल्हा समन्वयक रुजारिओ पिंटो, सावंतवाडी शाखाध्यक्ष संतोष सावंत, कवी संमेलनाध्यक्ष डॉ. दीपाली काजरेकर, कुडाळ शाखेचे कार्यवाह सुरेश पवार, गोविंद पवार, स्नेहल फणसळकर, स्वाती सावंत आदी उपस्थित होते.
वृंदा कांबळी यांनी, एवढी मोठी संस्था चालवताना सर्वांना जोडणारा विचारांचा एक मजबूत धागा असायला हवा आणि तो धागा म्हणजेच ''कोमसाप''वरील निष्ठा. कोणताही स्वार्थ न ठेवता निष्ठेने कार्य करताना कोमसापच्या माध्यमातून मोठी कार्ये करू शकतो, असे सांगितले. कवी विठ्ठल कदम व भरत गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुरेश पवार यांनी, सूत्रसंचालन प्रा. गोविंद पवार यांनी केले. आभार स्वाती सावंत यानी मानले. कवी रुजारिओ पिंटो, विठ्ठल कदम, सुरेश पवार, सेलेस्तिन शिरोडकर, अॅड. नकुल पार्सेकर, मधुकर जाधव, स्वाती सावंत, ऋतुजा केळकर, नारायण धुरी, मंदार सातबारा, राजेंद्र गोसावी, सुरेंद्र सकपाळ, दीपक पटेकर, सुस्मिता राणे, अनिल पोवार, अविनाश पाटील, दिलीप चव्हाण, प्रगती पाताडे, भानुदास तळगावकर, प्रदीप केळुसकर, आदिती मसूरकर, रिमा भोसले, स्मिता नाबर, कल्पना मलये, प्रा. सुभाष गोवेकर, कॅप्टन एस. टी. आवटी, राजस रेगे, अनुष्का रेवणकर, संतोष वालावलकर, बुधाजी कांबळी आदी साहित्यप्रेमींनी काव्यवाचन केले.
---
कवितांचे ३४ जणांकडून सादरीकरण
दुसऱ्या सत्रात डॉ. काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘भाकरी आणि फूल’ या कवी संमेलनात ३४ जणांनी स्वरचित कविता सादर केल्या. डॉ. काजरेकर यांनी ज्ञानेश्वरांपासून कवी केशवसुतांच्या व नंतरच्या कालखंडातील काव्य प्रवाहाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन स्नेहल फणसळकर यानी केले.