Virat Kohli on His Century: भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत रविवारी (२३ फेब्रुवारी) पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवून देण्यात विराट कोहलीने मोलाचा वाटा उचलला. त्याने दुबईला झालेल्या सामन्यात शतकी खेळी करत भारताचा विजय साकार केला.
भारताचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरल्याने त्यांचा सेमीफायनलमधील प्रवेश जवळपास पक्का झाला आहे.
या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानने २४२ धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने आधी शुभमन गिलसोबत ६९ धावांची भागीदारी केली.
गिलने ४६ धावा केल्या. गिल बाद झाल्यानंतर विराटने श्रेयस अय्यरसोबत ११४ धावांची भागीदारी केली. श्रेयसने ५६ धावा केल्या. विराट शेवटी १११ चेंडूत १०० धावा करून नाबाद राहिला. विराटला त्याच्या या खेळीबद्दल सामनावीर पुरस्कारही मिळाला.
विराटचे हे ५१ वे शतक आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८२ वे शतक आहे. विराटसाठी गेल्या काही महिन्यांपासून फॉर्ममध्ये चढ-उतार राहिला आहे. त्यामुळे त्याच्यावर गेल्या काही महिन्यांपासून टीकाही होत आहे. मात्र त्याने हे शतक झळकावत वनडेत १४ हजार धावांचा टप्पाही पार करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
विराटने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याच्या खेळीबद्दल समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, 'खरं सांगायचं तर, सेमीफायनलची जागा पक्की करणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात अशाप्रकारे फलंदाजी करून छानच वाटते. रोहित लवकर बाद झाल्यानंतरही चांगले योगदान देऊ शकलो, याचा आनंद आहे.'
'माझं काम खूप जोखीम न पत्करता मधल्या षटकात फिरकी गोलंदाजांविरुद्ध नियंत्रण ठेवण्याचे होते. शेवटी श्रेयसचे वेग दिला आणि मलाही बाऊंड्री मारण्याच्या संधी मिळाल्या. त्यामुळे मी माझा नेहमीचा वनडेतील खेळ करू शकलो.'
तो गेल्या काही महिन्यात होणाऱ्या टीकेबद्दल म्हणाला, 'मला माझा खेळ चांगला समजतो. बाहेरची मतं दूर ठेवणंच महत्त्वाचं होतं. मी माझा स्पेस सांभाळला आणि माझ्या ऊर्जेची आणि विचारांची काळची घेतली. अपेक्षा असताना खचून जाणे सोपे असते. पण वर्तमानात राहून संघासाठी योगदान देणे, माझे काम आहे. मी मला इतकेच सांगतो की मैदानात प्रत्येक चेंडूवर १०० टक्के देत रहायचे, देव त्याचं फळ देतो.'
सामन्यातील खेळाबद्दल म्हणाला, 'स्पष्टता असणे महत्त्वाचे होते. हे समजून घेणे गरजेचे होते की जेव्हा चेंडूमध्ये वेग होता, तेव्हा धावा करणं आवश्यक होतं, नाहीतर फिरकीपटू खेळ बदलू शकले असते.
'शुभमनने शाहिनविरुद्ध चांगली फलंदाजी केली, म्हणूनच तो सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. पॉवरप्लेमध्ये ६०-७० धावा करणे महत्त्वाचे होते, नाहीतर सामना परत आणण्यासाठीच पाठलाग करत रहावा लागला असता. श्रेयसने त्याच्या चौथ्या क्रमांकावर त्याचा खेळ केला आहे. त्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे.'
भारताचा पुढील सामना सात दिवसांनी म्हणजे पुढच्या रविवारी (२ मार्च) होणार आहे. त्यामुळे मिळालेल्या विश्रांतीच्या वेळेबद्दल विराट म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर वयाच्या ३६व्या वर्षी, हे छानच वाटते. आता थोडा आराम करायचा आहे कारण प्रत्येक सामन्यात असे योगदान देण्यासाठी मला खूप मेहनत करायला लागते.'
भारतीय संघाला पुढील सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध दुबईतच खेळायचा आहे.