चॅम्पियन्स ट्रॉफी : कुलदीपनं घेतले तीन बळी, पाकिस्तानचे 8 फलंदाज ड्रेसिंग रूममध्ये परतले
BBC Marathi February 24, 2025 09:45 AM
Getty Images

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत वन डे सामना सुरू झाला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने असलेल्या या सामन्याकडं संपूर्ण जगभरातील क्रीडा चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सावध सुरुवातीनंतर पाकिस्तानला सलग दोन धक्के बसले. त्यानंतर पुन्हा रिझवान आणि शकीलनं पाकिस्तानचा डाव सावरला. पण रिझवानचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. अक्षरने त्याला बोल्ड केलं.

त्यानंतरच्याच ओव्हरमध्ये हार्दिकनं सेट झालेल्या सऊद शकीललाही बाद केलं. त्यानं अर्धशतकी खेळी केली. तर त्यानंतर जडेजानं तय्यबला बाद करत भारताचा पाचवी विकेट मिळवून दिली.

नंतर सलमान आणि खुलदीलनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कुलदीपनं सलग दोन विकेट घेत पाकिस्तानला परत धक्का दिला.

पाकिस्ताननं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

टॉसनंतर बोलताना रोहित म्हणाला की, गोलंदाजी किंवा फलंदाजी काही असलं तरी फार काही फरक पडत नाही.

"आम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आमच्या संघात अनुभवी फलंदाज आहे, त्यामुळं सगळ्यांना काय करायचं ते माहिती आहे, त्यामुळं सगळ्यांना एकत्र येऊन उत्तम कामगिरी करून दाखवावी लागेल," असंही रोहित म्हणाला.

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानं या सामन्यात पाकिस्तानवर खूप दबाव आहे. तर भारतानं बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेची चांगली सुरुवात केली होती.

पाकिस्तानने हा सामना गमावला तर ते या स्पर्धेतून बाहेर पडू शकतात.

हार्दिकने मिळवून दिले पहिले यश

पाकिस्ताननं सावध सुरुवात करत 40 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली.

दरम्यान, गोलंदाजीला सुरुवात केल्यानंतर भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची लय फारशी चांगली वाटत नव्हती. त्यानंतर त्यानं गोलंदाजी करतानाच फिजिओंचा सल्ला गेला.

त्यानंतर तो फिजिओबरोबर ड्रेसिंगरूममध्ये गेल्यानं, शमीच्या दुखापतीच्या मुद्द्यावरून भारतीय संघाच्या चिंता वाढल्या होत्या.

पण शमीच्या जागी गोलंदाजीचा भार खांद्यावर घेतलेल्या हार्दिक पांड्यानं नवव्या ओव्हरमध्ये पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.

बाबर आझम 23 धावांंवर बाद झाला.

त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये कुलदीपच्या गोलंदाजीवर एक धाव चोरण्याच्या प्रयत्नान इमाम उल हक बाद झाला.

अक्षर पटेलनं डायरेक्ट हीट करत त्याला धावबाद केलं.

त्यानंतर काहीवेळानं शमी पुन्हा मैदानात आला आणि त्यानं 12 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीही केली.

Getty Images

पण दोन विकेट पडल्यानंतर मात्र पाकिस्तानचा कर्णधार रिझवाननं सऊद शकीलच्या साथीनं पाकिस्तानचा डाव सांभाळला.

9 व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानची दुसरी विकेट गेली होती. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेकपर्यंत दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली होती.

हार्दिकच्या चेंडूवर हर्षित राणाच्या हातून रिझवानचा झेल सुटला. पण त्याचा त्याला फार फायदा उचलता आला नाही. अक्षरने त्यानंतर त्याला बोल्ड केलं. रिझवानचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं.

त्याच ओव्हरमध्ये कुलदीपनं शकीलचाही झेल सोडला. त्यामुळं पाकिस्तानला जरा दिलासा मिळाला.

Getty Images

पण हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढच्याच ओव्हरमध्ये हार्दिकच्या गोलंदाजीवर शकील फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

त्यानंतर जडेजानंही कमाल दाखवली. तय्यब ताहीरला अवध्या 4 धावांवर बोल्ड करत आल्या पावली परत पाठवलं. या विकेटनंतर पाकिस्तानची धावसंख्या 5 बाद 165 झाली होती.

त्यानंतर सलमान आगा आणि खुलदील यांनी 200 धावांपर्यंत जडाप पुढं नेला. पण कुलदीपनं सलमान आगाला 19 धावांवर बाद केलं. आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीलाही पायचित केलं.

त्यामुळं पाकिस्तानची धावसंख्या 7 बाद 200 झाली होती. त्यानंतर कुलदीपनं नसीम शाहलादेखिल बाद केलं. कोहलीनं त्याचा झेल घेतला.

BBC

BBC या खेळाडूंवर असेल लक्ष

आजच्या सामन्यात भारताचे फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या कामगिरीकडं चाहत्यांच लक्ष लागलेलं असणार आहे.

तर अनेक बदलांच्या आव्हानांचा सामना करत असलेल्या पाकिस्तान संघातील फलंदाज माजी कर्णधार बाबर आझम आणि विद्यमान कर्णधार मोहम्मद रिझवान यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल.

संघाबद्दल बोलायचं झाल्यास या सामन्यासाठी भारतीय संघातील 11 खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे.

Getty Images

तर पाकिस्तानच्या संघात इमाम उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान अली आगा, तय्यब ताहीर, खुशदिल शाह, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रऊफ आणि अबरार अहमद यांचा समावेश आहे.

ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पाकिस्तान अजूनही भारतावर वरचढ असल्याचं दिसते. पण सध्याचा फॉर्म आणि गेल्या दोन दशकांतील कामगिरी पाहिली तर पाकिस्तानचा सध्याचा संघ सामान्य संघ असल्याचं दिसतं.

ANI

भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या 135 एकदिवसीय सामन्यांपैकी भारतानं 57 सामने जिंकले आहेत तर 73 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पण अलिकडची आकडेवारी आणि इतिहास पाकिस्तानच्या विरोधात जात असल्याचे दिसते. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या 11 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने 9 सामने जिंकले आहेत.

एकदिवसीय विश्वचषक असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा टी-२० विश्वचषक असो, पाकिस्तानी संघाने भारताविरुद्ध फक्त दोन सामने जिंकले आहेत.

वन डे वर्ल्डकप असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी असो पाकिस्तानच्या संघाला भारताच्या विरोधात गेल्या 11 सामन्यांत फक्त दोन वेळा विजय मिळवता आला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.