नवी दिल्ली : ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) आणि नवीन तंत्रज्ञान वापराबाबत भारताचा जगात कोणी हात धरू शकत नाही,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना केले.
‘एआय’च्या वापराबाबत भारत जगात अग्रेसर आहे असे मोदी म्हणाले. अलीकडेच पॅरिसमध्ये झालेल्या एआय ऍक्शन परिषदेत मोदी सहभागी झाले होते. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन यांच्यासोबत त्यांनी या परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविले होते.
फ्रान्समध्ये झालेल्या परिषदेचा संदर्भ मोदी म्हणाले की, फ्रान्समध्ये जगाने भारताची प्रगती पाहिली आणि त्याचे कौतुक केले. ‘‘आज भारतातले लोक वेगवेगळ्या प्रकारे ‘एआय’चा वापर करत आहेत. नव्या शतकात एआय मानवतेसाठी कोडिंग करत आहे. ‘एआय’च्या माध्यमातून कृषी, आरोग्य आणि इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला जाऊ शकतो,’’ असेही मोदी यांनी नमूद केले.
सोशल मीडिया ‘ती’च्या हातीयेत्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी मी माझी सोशल मीडिया खाती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांच्या हाती सोपविणार आहे. महिला त्यांचे काम आणि अनुभव याची माहिती या खात्यांद्वारे समाजासमोर मांडू शकतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याआधी २०२० मध्ये जागतिक महिला दिनी मोदी यांनी त्यांची सोशल मीडिया खाती सात महिलांच्या हाती सोपविली होती. एक्स, यूट्युब तसेच इन्स्टाग्राम आणि समाजमाध्यमांवर मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
तणाव न घेता परीक्षा द्याविद्यार्थ्यांनी तणाव न घेता परीक्षा द्यावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी दरवर्षी ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला जातो. यंदा हा कार्यक्रम नव्या स्वरूपात घेण्यात आला. दिल्लीच्या सुंदर नर्सरीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला, ही कल्पना देखील लोकांना खूप आवडली, असे मोदी म्हणाले.
वजन आटोक्यात ठेवादेशातील नागरिकांनी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी त्यांचे वजन आटोक्यात ठेवावे, असा सल्लाही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना दिला. ‘‘आठपैकी एक व्यक्ती वाढत्या वजनामुळे पीडित आहे. लहान मुलांमध्ये ही समस्या चारपटीने वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी खाण्यातील तेलाचे प्रमाण दहा टक्क्याने कमी केले पाहिजे,’’ असे मोदी यांनी नमूद केले. राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधत वैज्ञानिकाच्या स्वरूपात संशोधन प्रयोगशाळा तसेच तारामंडळांना भेटी देण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.