
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेऊन गेल्या तीन ते चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड केली जात आहे. लोणगाव येथील प्रत्येक शेतकऱ्यांने 1 ते 4 एकरापर्यंत, तर अल्पभूधारक शेतकऱ्याने किमान 10 गुंठ्यांत रताळ्याची शेती करीत आहे.
लाेणगावात 200 हेक्टर जमीनीवर रताळ्याची लागवड करण्यात आली असून, लाेणगावला रताळ्याचे माहेर घर म्हणून ओळखले जात आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा सण तोंडावर आला असल्यामुळे रताळी काढणीला वेग आला आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा रताळ्याच्या भावात घसरण झाली आहे. एक हजार ते 1200 रूपये दराप्रमाणे व्यापारी खरेदी करीत आहे. या वर्षी उत्पादनात निम्याने घट झालेली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे.
लोणगाव येथील शेतकऱ्यांचा रताळ्याची शेती करण्यावर अधिक भर आहे. आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळाची उपवासाच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला फराळ म्हणून मोठी मागणी असते. शेतकऱ्यांनी महाशिवरात्री जवळ आल्यामुळे जमिनीतून रताळ्यांची काढणी सुरू केली आहे. ही रताळी महाशिवरात्रीला बाजारात विक्रीसाठी नेली जाते. त्यातून लाखोंची उलाढाल होते. गतवर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रताळे लागवडीवर अधिक भर दिला होता.
लोणगाव येथील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात रताळ्याची लागवड केली होती. जालना जिल्ह्यात सर्वाधिक लोणगाव या गावात 200 हेक्टर जमीनीवर रताळ्याची लागवड करण्यात आलेली अाहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून लोणगावचे शेतकरी रताळ्याची लागवड करीत आहे. दिवसेंदिवस लागवडीचे क्षेत्रफळ वाढत आहे. जुलै महिन्यात लागवड केलेले रताळे फेब्रुवारी महीन्यात काढणीला येतात. महाशिवरात्रीच्या उपवासाला फराळ म्हणून बाजारात रताळीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून महाशिवरात्रीपूर्वी रताळ्यांची काढणी केली जाते. हे पीक कमी खर्चात आणि कमी वेळेत हलक्या प्रतीच्या जमिनीत उत्तम प्रकारे येते. सध्या सर्वत्र रताळी काढणीला वेग आला आहे.
टॅक्ट्रर तर, काहीजण बैलजाोडीच्या साह्याने रताळी काढीत असून, पोत्यामध्ये भरत आहे. गतवर्षी रताळ्याला 1800 ते 2000 रूपये क्विंटलचा भाव होता. तर हेक्टरी 250 क्विंटल उत्पन्न निघाले होते. मात्र, आता रताळ्याला एक हजार ते बाराशे रूपये भाव मिळत असून, हेक्टरी 150 क्विंटल उत्पन्न निघत आहे. यंदा भावात घसरण होऊन उत्पादनात घट झाली आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.