47354
बांदा येथे आजपासून महाशिवरात्रोत्सव
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. महाशिवरात्रोत्सव बुधवारी (ता. २६) होणार असून उद्या (२५) रात्री पालखी सोहळ्याने या उत्सवास प्रारंभ होईल.
कार्यक्रम असे ः उद्या रात्री ९ ते १२ बांदेश्वर मंदिराभोवती ‘श्रीं’ची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, बुधवारी महाशिवरात्रीदिनी सकाळी सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत स्वयंभू लिंगावर अष्टोप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक, ८ ते दुपारी ३ पर्यंत श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण, दुपारी ३.३० ते रात्री ८.३० या वेळेत विविध भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम, रात्री ९ ते १२ ‘श्रीं’ची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होईल. गुरुवारी (२७) दुपारी ४.३० वाजता ‘श्रीं’च्या पालखीचे वाजतगाजत श्री पाटेश्वर मंदिराकडे प्रस्थान, श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपरिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन होईल. त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा व भजन करून पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन, महाआरती, रात्री ९ वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका लोककला दशावतार नाट्यमंडळ मळगाव (ता. सावंतवाडी) यांचा ‘भक्तशिरोमणी संत कबीर’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. शुक्रवारी (२८) दुपारी १ ते ३ या वेळेत समाराधना होऊन या सोहळ्याची सांगता होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री बांदेश्वर देवस्थानने केले आहे.