टीम इंडियाने सलग गेल्या 2 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिलीय. टीम इंडियाने 2013 साली इंग्लंडवर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. तर 2017 साली पाकिस्तानने पराभूत केल्याने भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र टीम इंडियाने 23 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत हिशोब क्लिअर केला. टीम इंडियाचा हा चॅम्पियन्स ट्रॉफीतील नवव्या पर्वातील सलग दुसरा विजय ठरला. टीम इंडियाने बांगलादेशनंतर पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि शेजाऱ्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीतून जवळपास बाहेर केलंय.
त्यानंतर आता रोहितसेनेसमोर सर्वात तगडं आव्हान असणार आहे. टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्याला आता काही दिवस बाकी आहेत. हा सामना 2 मार्च रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंडचाही हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांचा साखळी फेरीत विजयाने शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 118 एकदिवसीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाने 118 पैकी सर्वाधिक 60 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने विजयाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर 7 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तसेच 1 मॅच टाय राहिली. तसेच दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत मोजून फक्त एकदाच भिडले आहेत. न्यूझीलंडने हा एकमेव सामना जिंकलाय. त्यामुळे आता 2 मार्चला विजयी हॅटट्रिकसह न्यूझीलंडचा पराभवाचा वचपा काढण्याची संधी रोहितसेनेकडे आहे. या सामन्यात काय होतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड क्रिकेट टीम : मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनव्हे, जेकब डफी, मॅट हेन्री, कायल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग.