जुनी सांगवी, ता.२४ : महापालिकेद्वारा आयोजित पवनाथडी जत्रेला नागरिकांनी कुटुंबासह हजेरी लावल्याने
रविवारी (ता.२३) अलोट गर्दी पाहायला मिळाली. महिला बचत गटांच्या विविध वस्तू खरेदी करतानाच खाऊ गल्लीत शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थांवर खवय्यांनी यथेच्छ ताव मारल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शाळा, महाविद्यालये, आयटी कंपन्या आदींना शनिवारी आणि रविवारी सुटी असल्याने पवनाथडी जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खान्देशी मांडे, इडली, ढोकळा, सुप, पाणीपुरी यासह चुलीवरील मटण भाकरी, माशांचे विविध प्रकार, बिर्याणी, वाफेवरील चिंबोरी, खेकडे यांच्या विविध पाककृतींचा खवय्यांनी आस्वाद घेतला.
बचत गट आणि नागरिकांच्या मागणीनुसार रविवारी रात्री एक तास जादा वाढवून देण्यात आला. त्यामुळे दहा ऐवजी रात्री ११ वाजता जत्रा बंद झाली. त्याचा फायदा झाल्याचे महिला बचत गटाच्या सदस्या कोमल गौंडाडकर यांनी सांगितले. परीक्षा व उन्हामुळे पहिल्या दिवशी प्रतिसाद कमी होता. मात्र, शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी राहिल्याचे खाद्यपदार्थ विक्रेत्या कोमल काळे यांनी नमूद केले. पोलिस प्रशासनासह महापालिका सुरक्षा विभाग, आरोग्य, विद्युत, स्थापत्य विभागाकडून यात्रेचे नियोजन करण्यात आले.