शेणखत ठरतेय शेतीस फायदेशीर : शेतकऱ्यांकडून वापर.
esakal February 25, 2025 12:45 AM

6607
कोनवडे (ता. भुदरगड) : परिसरातील शेतकरी शेतीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा वापर करत आहेत.
..............
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी
शेणखतच ठरतेय फायदेशीर

रासायनिक खतांऐवजी शेतकऱ्यांचे शेणखताला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २४ : रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. दर्जेदार व सकस उत्पादनासाठी शेणखत फायदेशीर असल्याने शेतकरी शेतासाठी शेणखत वापरत आहेत.
भुदरगड तालुक्यातील कूर, मिणचे, हेदवडे परिसराला वेदगंगा नदी, दूधगंगा उजवा कालवा, फये व पाटगाव प्रकल्पाचे मुबलक पाणी असल्याने येथे नंदनवन फुलले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रासायनिक खातांचा भरमसाट वापर केल्याने जमिनीचा पोत घसरत चालला आहे. जमिनीचा पोत नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा मारा कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सध्या शेतीत दर्जेदार उत्पादनासाठी शेणखत फायदेशीर ठरत आहे.
ग्रामीण भागात पशुधन मोठ्या प्रमाणात असल्याने शेणखत उपलब्ध होऊ लागले आहे. या शेणखाताला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पशुधन कमी असलेल्या पट्ट्यात शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. ट्रॉलीला दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत.
रासायनिक खते, टॉनिक, कीटकनाशक, तणनाशक यांच्या अतिवापराने पिकांबरोबर माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून शेतीला कोणत्या घटकाची कमतरता आहे, हे पाहणे आवश्यक आहे. वर्षांनुवर्षे ऊस पीक घेतल्याने आणि रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. सध्या शेतकऱ्यास शेणखताचे महत्व समजू लागले आहे.
................
चौकट...
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत चालल्यामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. यावर उपाय म्हणून एकरी २० ते २५ गाड्या शेणखत वापरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ताग, प्रेसमेड, गांडूळ खत, लेंडी खत यांचा वापर करून समतोल खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
- सुनील डवरी, कृषी पर्यवेक्षक, भुदरगड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.