मंचर, ता.२४ : “गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने उसाची शेती केली जाते. मात्र, आता बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून देशातील पहिला प्रयोग कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती करणे शक्य झाले आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना याकामी पुढाकार घेणार असून एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल,” अशी माहिती भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर (ता.आंबेगाव) येथे शरद बँकेच्या सभागृहात सोमवारी (ता.२४) झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत वळसे पाटील बोलत होते.
यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, विष्णू हिंगे उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, की सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शरदचंद्र पवार आधुनिक ऊस शेती विस्तार प्रकल्प या अंतर्गत बारामतीत भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक ऊस शेतीचा प्रयोग राबविला. तब्बल एक हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतातील उसावर हा प्रयोग करण्यात आला असून, त्याचे चांगले आणि फायदेशीर परिणाम समोर आला आहे. त्याबद्दल पवार यांनी सखोल माहिती दिली आहे.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या वतीने प्रकल्प राबविण्यात येत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती करणे शक्य होणार आहे. याकामी भीमाशंकर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.
- दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री
12621