यूपी वॉरियर्जने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्यावहिल्या सुपर ओव्हरमध्ये 4 धावांनी विजय मिळवला आहे. डब्ल्यूपीएल 2025 या तिसऱ्या हंगामातील नवव्या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये यूपी वॉरियर्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 9 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र सोफी एक्लेस्टोन हीने 9 धावांचा यशस्वीरित्या बचाव केला आणि यूपीला विजयी केलं. त्याआधी यूपीने बॅटिंग करत 2 एक्स्ट्रासह 8 धावा केल्या. यूपीचा हा या हंगामातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला.
आरसीबीने यूपीला विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. यूपीने या धावांचा शानदार पाठलाग करत सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत आणला. यूपीने 19 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 163 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये यूपीला विजयासाठी 18 धावांची गरज होती. तर यूपीकडून सोफी एक्लेस्टोन आणि क्रांती गौड या दोघी मैदानात होत्या. रेणुका सिंह हीने शेवटची ओव्हर टाकली.
रेणूकाने पहिला बॉल डॉट टाकला. सोफीने दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर 2 कडक सिक्स ठोकले. तर सोफीने चौथ्या बॉलवर चौकार ठोकला. त्यामुळे आता युपीला विजयासाठी 2 बॉलमध्ये 2 धावांची गरज होती. मात्र पाचव्या बॉलवर सोफीने 1 धाव घेतली आणि क्रांतीला स्ट्राईक दिली. यासह सामना बरोबरीत आला. आता यूपीला विजयासाठी 1 चेंडूत 1 धावेची गरज होती. रेणुकाने पद्धतशीर बॉल टाकला. क्रांती 1 धाव घेण्यासाठी धावली तर तिथून सोफी नॉन स्ट्राईक एन्डवरुन स्ट्राईक एंडला धाव पूर्ण करण्यासाठी धावली. मात्र विकेटकीपर रिचा घोष हीने हुशारीने सोफीला रन आऊट केलं आणि सामना बरोबरीत सुटला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), डॅनिएल व्याट-हॉज, एलिसा पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेयरहम, किम गर्थ, स्नेह राणा, एकता बिश्त आणि रेणुका सिंह.
यूपी वॉरियर्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण नवगिरे, वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, चिनेल हेन्री, उमा चेत्री (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, सायमा ठाकोर आणि क्रांती गौड.