Rachin Ravindra Record: सोमवारी (२४ फेब्रुवारी) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ६ वा लामना बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंड संघात रावळपिंडीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातून न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू रचिन रवींद्रने पुनरागमन केले. पुनरागमनातच त्याने शतकी धमाका करत मोठा विक्रमही केला आहे.
रचिनला फेब्रुवारीच्या सुरुवातीला तिरंगी मालिकेत लाहोरला पाकिस्तानविरुद्ध खेळताना क्षेत्ररक्षणादरम्यान डोक्याला जोरात चेंडू लागला होता. त्यामुळे तो रक्तबंबाळही झाला होता. त्याला नंतर कपाळाला टाकेही पडल्याने न्यूझीलंडकडून सांगण्यात आले होते.
त्यामुळे त्याला तिरंगी मालिकेतील काही सामन्यांना आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमधील न्यूझीलंडच्या पहिल्या सामन्याला मुकावे लागले. पण सोमवारी होत असलेल्या सामन्यापूर्वी तो फिट झाल्याने खेळण्यासाठी उपलब्ध होता. त्याने बांगलादेशविरुद्ध पुनरागमन करताना क्षेत्ररक्षणावेळी एक झेलही घेतला.
बांगलादेशने न्यूझीलंडसमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिल्या दोन विकेट्स १५ धावांतच गमावल्या होत्या.
पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रचिनने एका बाजूने संघाचा डाव सावरला. त्याने आधी डेवॉन कॉनवेसोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर त्याने टॉम लॅथमला साथीला घेतले. यादरम्यान रचिनने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्यानंतर त्याने लॅथमसोबतही अर्धशतकी भागीदारी केली आणि नंतर थोडी गती वाढवत ९५ चेंडूत त्याचे चौथे वनडे शतक पूर्ण केले.
या शतकी खेळीदरम्यान त्याने एक विक्रम केला आहे. रचिनचा हा ३० वा वनडे सामना असून त्याने २६ डावात फलंदाजी करताना १००० धावांचा टप्पाही पार केला आहे. तो वनडेत सर्वात कमी डावात १००० धावा करणारा पाचवा खेळाडू आहे. त्याने केन विलियम्सनलाही मागे टाकले आहे.
विलिम्यसनने ३३ डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या. तो या विक्रमाच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहे. रचिनचे बांगलादेशविरुद्ध झळकावलेले वनडेतील पाचवे अर्धशतक आहे.
न्यूझीलंडसाठी वनडेत सर्वात जलद १००० धावा२२ डाव - डेवॉन कॉनवे
२४ डाव - ग्लेन टर्नर
२४ डाव - डॅरिल मिचेल
२५ डाव - अँड्र्यू जॉन्स
२६ डाव - रचिन रवींद्र
२८ डाव - विल यंग
२९ डाव - ब्रुस एगार
२९ डाव - जेस्सी रायडर
३१ डाव - जॉन राईट
३२ डाव - हमिश मार्शेल
३३ डाव - ऍडम पॅरोर
३३ डाव - पीटर फुल्टन
३३ डाव केन विलियम्सन
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २३६ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार नजमुल हुसैन शांतोने ७७ धावांची खेळी केली. तसेच जाकर अलीने ४५ धावा केल्या, तर तान्झिद हसनने २४ आणि रिषाद हुसैनने २६ धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा पार करता आला नाही.
न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. विल्यम ओ'रुर्कीने २ विकेट्स घेतल्या, तर मॅट हेन्री आणि काईल जेमिसन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.