ढिंग टांग
स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी. वेळ : निजानीज.
चि. विक्रमादित्य : (बेडरुमच्या दारावर टकटक करत) हाय देअर, बॅब्स…मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (कानटोपी चढवत) नोप! ही रात्रीची वेळ आहे, सभ्य माणसं यावेळी झोपतात! तूदेखील दूध पिऊन झोप हो!!
विक्रमादित्य : (बेधडक खोलीत शिरत) कमॉन बॅब्स…ही काय झोपायची वेळ आहे? बाहेर अजून किती मज्जा चालू आहे! दिवस कुठे संपलाय?
उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत) माझा संपलाय! गुडनाईट!!
विक्रमादित्य : (मूळ मुद्द्याचा डायरेक्ट हात घालत) बॅब्स, आय हॅव अ क्वेश्चन!
उधोजीसाहेब : (डोक्यावर पांघरुण घेत) उद्या विचार!
विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) आपल्याकडे किती मर्सिडिझ आहेत?
उधोजीसाहेब : (कंप्लीट झोप उडून) क्काय? हे कोण विचारतंय?
विक्रमादित्य : (शांतपणे) मीच विचारतोय! आपल्याकडे किती मर्सिडिझ आहेत?
उधोजीसाहेब : (इकडे तिकडे बघत) हळू विचार जरा! भिंतींना कान असतात!
विक्रमादित्य : (जाब विचारल्यागत) असू देत! भिंतींनी ऐकलं तर काही बिघडत नाही! ऐकलं तर ऐकलं! त्यांना बोलायला तोंड कुठाय? सांगा, आपल्याकडे किती मर्सिडिझ आहेत?
उधोजीसाहेब : (कळवळून) झोपू दे ना मला शांतपणे! का असले प्रश्न विचारुन झोप उडवतोस?
विक्रमादित्य : (उग्र चेहरा करुन) नेशन वाँट्स टु नो! मुकाट्याने जबाब दो! आप के पास कितनी मर्सिडिझ है?
उधोजीसाहेब : (संयमानं) इतका वेळ ऐकून घेतलं म्हणून गैरसमज करुन घेऊ नकोस! मी असल्या फालतू प्रश्नांना उत्तरं देत नसतो!!
विक्रमादित्य : (हेका न सोडता) प्रश्न गंभीर आहे, गांभीर्यानं उत्तर द्या! कारण दिल्लीत साहित्य संमेलनात हा गहन प्रश्न उपस्थित झाला आहे! बोला, तुमच्याकडे किती मर्सिडिझ आहेत?
उधोजीसाहेब : मराठी साहित्याचा आणि मर्सिडिझचा काय संबंध?
विक्रमादित्य : (खांदे उडवत) दॅट आय डोण्ट नो…काही तरी संबंध असणारच! त्याशिवाय साहित्य संमेलनात हा प्रश्न कसा उपस्थित होईल?
उधोजीसाहेब : (दातओठ खात) मला माहितीये, त्या नीलमताईंनी सगळा घोळ केलाय!! ‘दोन मर्सिडिझ दिल्या की एक पद’ असा रेट त्यांनी जाहीर केलाय!
विक्रमादित्य : (हरखून) टू मर्सिडिझ इज इक्वल टु वन पोस्ट? दॅट्स अ बॅड डील!! फेरारी तरी मागायची? किंवा तीन बीएमडब्ल्यू!!
उधोजीसाहेब : (संशयानं) खामोश! तू प्रतिक्रिया देतोयस की टोमणा मारतोयस?
विक्रमादित्य : (बोटं मोडत) वायफळ गप्पा नकोत, प्लीज! आकडा सांगा, एक-दोन, बारा-बावीस? चाळीस-बेचाळीस?...किती? जस्ट टेल मी द नंबर!!
उधोजीसाहेब : (अजीजीनं) इडीनं विचारावं, तसं विचारु नकोस रे! इडीवालेही असं विचारत नाहीत कधी!!
विक्रमादित्य : (हिशेबासाठी कॅलक्युलेटर काढून) एका मर्सिडिझची किंमत किती असते? आय मीन, एक्स शो रुम प्राइस!!
उधोजीसाहेब : (वैतागून) अरे, मला काय माहीत?
विक्रमादित्य : (थक्क होत) कमॉन…तुम्हाला तुमच्याकडे किती मर्सिडिझ आहेत, हे माहीत नाही! त्यांची ऑन रोड विथ टॅक्स किती किंमत आहे, तेही माहीत नाही! याचा अर्थ काय होतो?
उधोजीसाहेब : (विषण्ण उद्गार काढत) तुम क्या जानो एक मर्सिडिझ की कीमत, विक्रमादित्यबाबू!…भलभलते आरोप करुन संमेलनं गाजवायची ही लाइन आहे! माझं ऐक, तूसुद्धा सगळ्या चौकशा बंद कर, झोपायला जा!!
विक्रमादित्य : (कुतूहलाने) वन लास्ट क्वेश्चन…तुम्ही इलेक्ट्रिक व्हेइकलचं व्हेरियंट का ट्राय करत नाही? पर्यावरण नाम की भी कोई चीज होती है, बॅब्स!!