ठाण्यात गणेश नाईकांचा भरगच्च जनता दरबार, शिंदे गट हादरला
Marathi February 25, 2025 10:24 AM

एकनाथ शिंदे महाकुंभात डुबकी मारत असतानाच पालघरचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज मिंध्यांच्या नाकावर टिच्चून ठाण्यात जनता दरबार घेतला. रघुवंशी सभागृहात झालेल्या जनता दरबारामध्ये ठाणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. मिंध्यांनी कामे लटकवली अशा अनेकांनी न्याय मिळवण्यासाठी या जनता दरबारात हजेरी लावली. ठाणे शहरासह जिह्याच्या विविध भागांतून 650 पेक्षा अधिक निवेदने गणेश नाईक यांना देण्यात आली. या भरगच्च जनता दरबारामुळे शिंदे गट हादरला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे गणेश नाईक यांनी आपण ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच मिंध्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जर गणेश नाईक हे ठाण्यात जनता दरबार घेणार असतील तर आपणही पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेऊ असे स्पष्टपणे सांगितले. मिंधे व भाजपच्या नेत्यांमध्ये ‘कोल्ड वॉर’ सुरू असतानाच आज नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेऊन मिंध्यांना दे धक्का दिला. मी पालघरचा पालकमंत्री असलो तरी भाजपने ठाणे जिह्याच्या संपर्कमंत्रीपदी आपली नियुक्ती केल्याने येथील नागरिकांच्या तक्रारी जाणून घेणे हे आपले प्रमुख कर्तव्य असल्याचे नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

  • आज ठाण्यात घेतलेल्या जनता दरबाराच्या वेळी विविध खात्यांचे अधिकारी तसेच भाजपचे आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱयांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. मिंध्यांना डिवचण्यासाठी यानिमित्ताने शक्तीप्रदर्शनही करण्यात आले.
  • जनता दरबारात आपण नागरिकांच्या समस्यांची माहिती करून घेतली असून त्याचा पाठपुरावा करणार आहे. तसेच पंधरा दिवसांत या प्रश्नांवर काय कार्यवाही केली याचा आढावा पुढील जनता दरबारात घेणार असल्याचे गणेश नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. याचा अर्थ ते ठाण्यात वारंवार जनता दरबार घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • ठाणे जिह्यातील सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करीत असून जनतेला दिलेला शब्द आम्ही पाळतो, असे नाईक यांनी सांगितले. या जनता दरबारामुळे मिंध्यांच्या पदाधिकाऱ्यांची मात्र गोची झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.