
मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. न्यू मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत होणाऱया या सोहळय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळय़ासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेदेखील उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या अखंड पाठपुराव्यामुळे मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात’ दर्जा मिळाला आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम असल्याने सुप्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘मराठी भाषा दिन’ मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या सोहळय़ाची जय्यत तयारी स्थानीय लोकाधिकार महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस, महासंघ कार्याध्यक्ष आमदार सुनील शिंदे आणि महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महासंघ पदाधिकारी, संलग्न समित्यांचे पदाधिकारी आणि विभागप्रमुख संतोष शिंदे परिश्रम घेत आहेत.
- मराठी भाषा दिन सोहळय़ानिमित्त शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध आस्थापनांतील स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी आणि मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. या भव्य सोहळा यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्ते, लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भगव्याचे तेज आणि सांस्कृतिक मेजवानी
मराठी भाषा दिन सोहळय़ानिमित्त मरीन लाइन्स परिसरात जागोजागी भगवे झेंडे, पताका आणि मराठी भाषा दिवसाचे बॅनर्स लावण्यात येणार असल्याने दक्षिण मुंबई परिसरात भगवे वादळच येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वर मैफीलचे परेश दाभोलकर प्रस्तुत ‘बोल मराठी, ताल मराठी’ हा मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रमही होणार आहे. यानिमित्ताने मुंबईत मराठीचा जागर पाहायला मिळणार आहे.
स्थळ – बिर्ला मातोश्री सभागृह, न्यू मरीन लाइन्स
वेळ – सायं. 6 ते रात्री 9