पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले?
Marathi February 25, 2025 10:24 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण’ झाले.  ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्या’चे 2000 रुपये ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. यावेळी देशभरातील 9.7 कोटींहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सुमारे ₹21500  कोटींपेक्षा अधिक सन्मान राशी थेट हस्तांतरित करण्यात आली.  पीएम किसान सन्मान निधी योजनेची सहा वर्ष पूर्ण झाली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. जे शेतकरी या योजनेचे  पहिल्यापासून सदस्य असतील, त्यांना आतापर्यंत 19 हप्त्यांचे 38000 रुपये मिळाले आहेत.

पीएम किसानवर आतापर्यंत किती खर्च?

मागील सहा वर्षात पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील 3.7 लाख कोटी रुपये 10 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आले. तर महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्त्यांमध्ये 33 हजार 565 कोटींचा लाभ जमा झाला आहे.

महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना लाभ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 21500 हजार कोटी रूपये  काल देशातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात आले. राज्यातील 92.89 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 1 हजार 967 कोटी रूपये थेट वितरीत झाले आहेत.

पीएम किसान सन्मान योजनेची सहा वर्ष पूर्ण

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्यामध्ये 9  कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये पाठवण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी 21500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारच्या कार्यकाळाच्या शेवटी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2019 ला देण्यात आला होता. दर चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये वर्ग केले जातात.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 15000 रुपये मिळणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील 6000 रुपये राज्य सरकारकडून दिले जातात. राज्याच्या योजनेत 3000 रुपयांची वाढ करुन शेतकऱ्यांना एका वर्षात 15000 रुपये देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

मोदी सरकारनं 6 वर्षात शेतकऱ्यांना दिले 3.68 लाख कोटी रुपये, किती शेतकऱ्यांना मिळाला ‘या’ योजनेचा लाभ?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.