EPFO कडून पुन्हा मुदतवाढ, UAN अन् आधार बँक खातं लिंक केल्यास 15000 मिळणार, जाणून घ्या योजना
Marathi February 25, 2025 11:25 AM

नवी दिल्ली :एम्पलॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओशी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. रोजगार-लिंक्ड प्रोत्साहन निधी म्हणजेच ईएलआय योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास यूएएन सक्रिय करणं आवश्यक आहे. याशिवाय बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावं लागेल. या प्रक्रियेला 15 मार्च  2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ यापूर्वी अनेकदा वाढवण्यात आली आहे. यापूर्वीची डेडलाईन 15 फेब्रुवारी 2025 होती. ईएलआय योजनेतून पहिल्यांदा नोकरी लागलेल्यांना 15000 रुपयांचा प्रोत्साहन निधी केंद्र सरकार देणार आहे.

15 मार्चपर्यंत मुदतवाढ

श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून 21 फेब्रुवारी 2025 ला एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यानं म्हटल्याप्रमाणं यूएएन सक्रिय करण्यासाठी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत 15 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यूएएन क्रमांक ईपीएफओकडून प्रत्येक खातेदाराला दिला जातो. हा क्रमांक 12 अंकांचा असतो. कर्मचारी त्यांच्या करिअरमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करतात, त्यावेळी त्यांचं पीएफ खातं मॅनेज करण्यासाठी यूएएनद्वारे सिंगल पॉईंट अॅक्सेस दिला जातो.

ELI स्कीमच्या लाभासाठी यूएएन सक्रिय करणं गरजेचं

ईएलआय योजनेतून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांचा यूएएन क्रमांक सक्रिय करावा लागेल. याशिवाय बँक खात्याला आधार क्रमांकाशी लिंक करणं अनिवार्य आहे. ईपीएफओनं या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. याशिवाय अंतिम तारखेची वाट न पाहता ईएलआयच्या लाभासाठी यूएएन  क्रमांक सक्रिय करा आणि त्यासोबत आधार बँक खातं लिंक करुन घ्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ईएलआय योजनेची सुरुवात केली होती. ही योजना तीन प्रकारे काम करते. ही योजना पहिल्यांदा रोजगार मिळवणाऱ्या आणि ईपीएफओमध्ये सदस्य होणाऱ्यांना आर्थिक लाभ देते. पहिल्या प्रकारात कर्मचाऱ्यांना 15000 रुपयांची रक्कम प्रोत्साहन निधी म्हणून दिली जाते. दुसऱ्या प्रकारात उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीवर भर देते. तिसऱ्या प्रकारात अतिरिक्त रोजगार देणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं.

इतर बातम्या :

PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अपडेट समोर

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दिलासा, 25000 रुपयापर्यंतची रक्कम काढता येणार

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.