चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत आठ संघ खेळले जात असून त्यातील ४ संघ आशिया खंडातील आहेत. त्यामुळे या स्पर्धेचे विविध भाषांमध्ये समालोचनही होत आहे. यात हिंदी भाषेचाही समावेश आहे.
स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर हिंदी समालोचनाचीही विशेष टीम आहे. यात भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगचाही समावेश आहे. मात्र, नुकतेच त्याने हिंदी समालोचनावर टीका करणाऱ्या एका युझरला सडेतोड उत्तर दिले आहे.
झाले असे की भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर हरभजन सिंगने ब्रॉडकास्टर निखिल नाझ आणि विक्रांत गुप्ता यांच्यासोबत एक फोटो शेअर केला होता. हा फोटो विक्रांत गुप्ता यांनी रिपोस्ट केला होता.
यावर Legolas नावाच्या एका युजरने कमेंट केली की 'स्टार स्पोर्ट्समधील हिंदी समालोचन हे सुंदर निळ्या ग्रहावरील सर्वात भयानक गोष्टींमध्ये स्थान मिळवू शकते.'
या युजरच्या कमेंटवर प्रत्युत्तर दिले आहे. त्याने लिहिले की 'वाह अंग्रेजो की औलाद. तूझी लाज वाटते. आपली भाषा बोलणे आणि ऐकण्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे.' हरभजन सिंगच्या या उत्तरावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
काहींनी हरभजनला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी त्याच्यावर टीका केली आहे की तो युझर भाषेबद्दल नव्हे, तर गुणवत्तेबद्दल बोलत होता.
हरभजन सिंगने काही वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो नंतर त्याने समालोचन क्षेत्रात पाऊल टाकले. हरभजनने त्याच्या कारकिर्दीत १०३ कसोटी सामने खेळले असून ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २३६ वनडे सामने खेळले असून २६९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून २५ विकेट्स घेतल्या आहेत.
सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पाकिस्तान ५० व्या षटकातच २४१ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर २४२ धावांचे लक्ष्य भारताने ४३ षटकातच ४ विकेट्स गमावत पूर्ण केले. त्यामुळे हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला. या सामन्यात विराट कोहलीने त्याचे वनडेतील ५१ वे शतक केले होते.