- rat२५p२.jpg-
P२५N४७५३८
संगमेश्वर ः फणसाच्या कुयरीपासून बनवलेल्या पदार्थांची चव घेऊन परीक्षण करताना परीक्षक.
-----
फणसाची कुयरीपासून बनले ४० पदार्थ
धामणीत पाककला स्पर्धा ; बिर्याणी, बुर्जी, थालीपिठासह विविध पदार्थ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः तालुक्यातील धामणी येथील दी ड्राईव्ह इन रेस्टॉरंटच्या ३८व्या वर्धापनदिनानिमित्त कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांत आणि लायन्स क्लब संगमेश्वर यांच्यातर्फे पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी ''फणसाच्या कुयरीचे शाकाहारी पदार्थ'' असा विषय होता व त्यामध्ये ५६ स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये अनेकविध नावीन्यपूर्ण पाककृती पाहावयास मिळाल्या.
फणसाच्या कुयरीचा उपमा, बुर्जी, वडे, टिक्की, लॉलीपॉप, शोरमा, कटवडा, रोल, थालीपीठ, क्रंची कॅन्डी, बर्फी, कटलेट, पराठा, भानोले, बिर्याणी, कबाब, पकोडा, तंदुरी, समोसे, दाबेली असे ४० विविध नावीन्यपूर्ण पदार्थ व त्याचे सादरीकरण करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून केतन रेडीज, प्रा. मयुरी काटकर, ईशान लोध, श्रीराज मुळ्ये यांनी काम पाहिले. या वेळी दी ड्राईव्ह इन रेस्टॉरंटचे अमोल लोध, कोकण भूमी कृषी पर्यटन संस्थेच्या कोकण प्रांत अध्यक्ष डॉ. मीनल ओक, संस्थेचे ज्येष्ठ संचालक माधव महाजन, कृषी पर्यटन संस्थेचे संचालक डॉ. विकास शेट्ये, मकरंद केसरकर, नंदादीप पालशेतकर, रवीकिरण जाधव, प्रमोद केळकर आदी उपस्थित होते. श्रीनिवास पेंडसे यांनी खाद्यसंस्कृती या विषयावर विचार मांडले.
----
सायली वाणीची फ्रेंच डिश
सावर्डेतील सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमच्या सायली वाणीने तयार केलेल्या जॅकफ्रूट कारडॉन ब्ल्यू (Jackfruit Cardon Blue) या पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला. सायलीने फ्रेंच डिश स्थानिक पद्धतीने केल्याचे नमूद केले. द्वितीय क्रमांक नवनिर्माण कॉलेजच्या सुयोग जोगळेने केलेल्या फणसाच्या रोलने आणि तृतीय क्रमांक दिक्षांत हरेकरने केलेल्या फणसाच्या बिर्याणीने पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक वैशाली पटेल यांनी केलेल्या फणस कुयरी हांडवो या पदार्थाला देण्यात आले.