कामोठ्यातील गॅस शवदाहिनीचे आमदार ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण
कामोठे, ता. २५ (बातमीदार) : पनवेल महापालिकेला सिडकोने हस्तांतरित केलेल्या कामोठेमधील गॅस शवदाहिनीचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी नाममात्र शंभर रुपयात अंत्यविधी करता येणार आहे.
या वेळी आमदार ठाकूर म्हणाले, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी पाऊल उचलले पाहिजे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पनवेल महापालिका स्तुत्य उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे. सिडकोने कामोठे सेक्टर १५ मधील स्मशानभूमीत सुमारे ७० लाख रुपये खर्चून गॅस शवदाहिनीचे बांधकाम पूर्ण केले. यानंतर मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेत स्मशानभूमी महापालिकेला हस्तांतरित केली. महापालिकेने सुमारे सात ते आठ लाख रुपये खर्चून शवदाहिनीचे किरकोळ काम केले. तसेच महानगर गॅसची जोडणी केली आहे. या स्मशानभूमीत लाकडावर अंत्यविधी करण्याची व्यवस्था आहे. यासाठी अडीच हजार रुपये खर्च येतो; मात्र गॅस अंत्यविधी करण्यासाठी नाममात्र शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याने नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कामोठेव्यतिरिक्त पनवेल, नवीन पनवेल, खारघर येथे गॅस शवदाहिनी उपलब्ध आहे. कळंबोली येथे गॅस शवदाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, माजी आरोग्य सभापती डॉ. अरुणकुमार भगत, भाजप शहराध्यक्ष रवींद्र जोशी, सामाजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर, भाजप माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.