म्हसळ्यात ऐतिहासिक ‘वाघनख’ नाटकाला प्रतिसाद
म्हसळा, ता. २५ (बातमीदार) ः स्वराज्य सप्ताहाचे औचित्य साधून ऐतिहासिक ‘शिवनाट्य वाघनख’ नाटकाचा प्रयोग म्हसळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणात प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडला. नाटकातील प्रसंग सादर होत असताना प्रेक्षक अत्यंत भावुक तर काहीप्रसंगी अतिउत्साही होताना दिसून आले. तर काहीप्रसंगी हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमत होता. याप्रसंगी नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आनंद स्नेहचंद्र यांचा शाल, श्रीफळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष समीर बनकर आणि माजी जि.प. सभापती बबन मनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष संजय कर्णिक, तहसीलदार सचिन खाडे, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, माजी सभापती उज्ज्वला सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कोकणात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘वाघनख’ या नाटकाचे प्रयोग सादर करतो. त्यावेळी प्रेक्षकांचा फार मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे माझे प्रयोग खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात, असे आनंद स्नेहचंद्र यांनी सांगून प्रेक्षकांचे आभार मानले.