47630
मालवणातील प्रशांत हिंदळेकर
नववर्ष स्वागत यात्रा प्रमुखपदी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. नववर्ष स्वागत यात्रेचे हे २२ वे वर्ष असून यावर्षी स्वागत यात्रा प्रमुख म्हणून प्रशांत हिंदळेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.
गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा नियोजन बैठक शहरातील भरड दत्त मंदिर येथे पार पडली. या बैठकीस भाऊ सामंत, विजय केनवडेकर, अमित खोत, कृष्णा ढोलम, अनिकेत फाटक, रत्नाकर कोळंबकर, श्रीराज बादेकर, शुभम लुडबे, हरेश फडते, अरविंद मयेकर, दीनानाथ गावडे, उदय गावडे, श्रीराम परब यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्याच उत्साहात व हिंदू बांधवांच्या सहकार्यातून व सर्वांच्या एकजुटीतून यात्रा नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. स्वागत यात्रेत सिंधुदुर्गातील स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून त्या धर्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. ढोल पथक, वेशभूषा स्पर्धा, यांसह मर्दानी खेळ, महिलांच्या फुगडी सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत केले जाणार आहे. मालवणातील विविध सामाजिक संस्था, विविध महिला मंडळे, शाळा, महाविद्यालय यांच्या सहभागातून व त्यांच्या संकल्पनेतून आणखी काही कार्यक्रम आयोजित करण्यात येतील का० याबाबतही त्यांच्याशी संपर्क साधण्यात येणार आहे व पुढील बैठकीत याबाबतचे नियोजन स्पष्ट केले जाणार आहे. यावर्षीची स्वागत यात्रा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्याबाबत बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.