Champions Trophy अन् ऑस्ट्रेलियाच्या मार्गात १२ वर्षांपासून पाऊसच अडथळा; तब्बल चौथ्यांदा सामना रद्द
esakal February 26, 2025 02:45 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सातव्या सामन्यात मंगळवारी (२५ फेब्रुवारी) रावळपिंडी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होणार होता. मात्र नाणेफेक होण्याच्या आधीपासूनच रावळपिंडीमध्ये पाऊस पडत होता. पाऊस थांबण्याची बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतर अखेर सामनाधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे दोन्ही संघांना आता प्रत्येकी १ गुण देण्यात आले आहेत. या दोन्ही संघांनी आपापले पहिले सामने जिंकले होते, त्यामुळे आता त्यांचे प्रत्येकी ३ गुण झाले आहेत. त्यामुळे ते ज्या गटात आहेत, त्या ब गटात सेमीफायनलसाठी चुरस निर्माण झाली आहे.

तथापि, ऑस्ट्रेलियाचा सामना पावसामुळे रद्द होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांचे २०१३ पासून चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आत्तापर्यंत चारवेळा सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. विशेष म्हणजे २०१३ पासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जितके सामने पावसामुळे रद्द झालेत, त्याच ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे.

यापूर्वी २०१३ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध बर्मिंगहॅमला होणारा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्या स्पर्धेत त्यांना सेमीफायनलही गाठता आली नव्हती.

त्यानंतर २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही ऑस्ट्रेलियाचे तब्बल दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यांचा बर्मिंगहॅमलाच न्यूझीलंडविरुद्धच होणारा सामना पावसामुळे रद्द झालेला, तर बांगलादेशविरुद्धही द ओव्हलला होणारा सामनाही पावसामुळे रद्द झाला होता.

२०१७ मध्ये त्यांना इंग्लंडविरुद्ध पराभूतह व्हावं लागलेलं. त्यामुळे त्या स्पर्धेत ते विजयाशिवायच मायदेशी परतले होते. आता २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना रद्द झाला आहे.

आता ऑस्ट्रेलियाचा २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अखेरचा साखळी सामना २८ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना लाहोरला खेळवला जाणार आहे. हा सामना जर ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर ते उपांत्य फेरीतील स्थान पक्के करतील. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला ५ विकेट्सने पराभूत केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.